Chhagan Bhujbal देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश झाला आहे. मंगळवारी राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तसंच आता त्यांना अन्न आणि नागरि पुरवठा खातं मिळालं आहे. छगन भुजबळ मंत्री म्हणून शपथ घेतील हे सोमवारी स्पष्ट करण्यात आलं होतं. काही वेळापूर्वीच छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“माझी ९ ते १० वेळा मंत्रिमंडळात एंट्री आणि एक्झिट झाली. नऊ ते दहा वेळा पदभार स्वीकारला आणि सोडलाही. पण आनंद आहे. अन्न आणि नागरि पुरवठा खातं हे माझ्याकडे तिसऱ्यांदा आलं आहे. शरद पवारांसह असताना माझ्याकडे हे खातं होतं. महाविकास आघाडीमध्ये असताना हे खातं माझ्याकडे होतं. महायुतीत आल्यावर माझ्याकडे मंत्रिपद नव्हतं आता ते खातं महायुती आल्यावर पुन्हा माझ्याकडे आलं आहे. शिवभोजन थाळी योजना बंद करणार अशा चर्चा मी पण ऐकल्या होत्या. मात्र मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की रोज दोन लाख लोकांना एक वेळचं जेवण मिळतं. रोज लोकांना थोडं तरी सहकार्य मिळालं पाहिजे अशी माझी भावना. रोज लोक पोट भरतात आणि सरकारचा प्रचार होतो. १४० ते १५० कोटी रुपये त्यासाठीचा खर्च आहे. ही योजना बंद करु नका हे मी सांगतिलं. दक्षिण भारतात अशा योजना गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहेत याचंही उदाहरण मी दिलं. त्यामुळे हे बंद करणं योग्य होणार नाही. ही योजना सुरु आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

महायुतीचं सरकार आल्याने कुठलीही योजना बंद झालेली नाही-भुजबळ

महायुतीचं सरकार आल्यामुळे कुठल्याही योजनांवर बंदी येते असा एक भाग नाही. एकदम मोठा खर्च जर घरात निघाला मग तो लग्नाचा असेल, शाळेची मोठी फी भरणं असेल किंवा मोठं आजारपण असेल तर माणूस विचार करतो की थोडी कळ काढू. सरकारचे पैसे जनतेकडून येतात. पैसे काही एकदम ४० ते ५० हजार कोटी वाढत नाहीत. लाडकी बहीण योजनेसाठी जो खर्च झाला त्यामुळे निधीबाबत अडचण निर्माण झाली आहे. मात्र हळूहळू मार्ग काढला जातो आहे. तसंच उत्पन्न वाढलं की की सगळे प्रश्न आटोक्यात येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतर योजनाही सुरळीत होतील-भुजबळ

शिवभोजन थाळी सुरुच आहे, इतर योजना आहेत त्याही सुरळीत होतील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काही योजनांबाबत आम्ही केंद्राकडे मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करु. अनेकदा काही योजनांमध्ये पात्र नसलेले लोकही फायदा घेतात. त्यामुळे अपात्र जे आहेत त्यांच्याबाबतचीही कारवाई करुन पात्र लोकांसाठीची मर्यादा वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी आम्ही समितीही नेमली आहे असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.