राज्यात एकीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा मुद्दा तापू लागलेला असतानाच पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून राजकीय तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आज १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात सर्वाधिक चर्चा पुण्याच्या पालकमंत्रीपदाची आहे. पुण्यात अजित पवार व चंद्रकांत पाटील यांच्यातील सुंदोपसुंदी सर्वश्रुत असताना आता चंद्रकांत पाटलांकडून पुण्याचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे गेलं आहे. त्यापाठोपाठ छगन भुजबळांना पहिल्या फेरीत कोणतंही पालकमंत्रीपद मिळालं नाही. त्यासंदर्भात खुद्द भुजबळांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
पहिल्या यादीत कुणाचा समावेश?
राज्य सरकारने पहिल्या यादीत १२ नावांचा समावेश केला आहे. त्यानुसार अजित पवार (पुणे), राधाकृष्ण विखे-पाटील (अकोला), चंद्रकांत पाटील (सोलापूर व अमरावती), विजयकुमार गावित (भंडारा), दिलीप वळसे-पाटील (बुलढाणा), हसन मुश्रीफ (कोल्हापूर), धर्मरावबाबा अत्राम (गोंदिया), धनंजय मुंडे (बीड), संजय बनसोडे (परभणी), अनिल पाटील (नंदुरबार) व सुधीर मुनगंटीवार (वर्धा) या मंत्र्यांचा समावेश आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
एकीकडे अजित पवार गटातील इतर काही मंत्र्यांचा यादीत समावेश असला, तरी गटातील एक ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र पालकमंत्रीपद मिळालेलं नाही. भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा आग्रह धरला असून सध्या हे पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे आहे. यासंदर्भात भुजबळ म्हणाले, “नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत जाहीर होईल हे मला माहिती नाही. मी त्या चर्चेत नाही. याचं योग्य उत्तर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीच देऊ शकतील. माझी इच्छा काय आहे हा महत्त्वाचा मुद्दा नाही”, असं भुजबळ म्हणाले.
रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम; भरत गोगावले म्हणाले, “वर्णी लागत नाही तोवर…”
“नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार आमचे आहेत. सहा आमदार आहेत. सातवे खोसकरही आमचेच आहेत. त्यामुळे तिथे पालकमंत्रीपदावर आमचा दावा आहे. रायगडच्या बाबतीतही आमचे आमदार मंत्री तिथे आहेतच. पण आमचे खासदारही आहेत. कोकण विभागात एक तरी जिल्हा आम्हाला हवाय ही आमची भूमिका आहे. आता त्यावर काय तोडगा निघतो बघू”, असं भुजबळांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
“वाद नव्हे, चर्चा!”
दरम्यान, सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद नसून चर्चा होत असल्याचं भुजबळ म्हणाले. “वाद नाही, चर्चा आहे. शिंदे गट आधीच तिथे गेला आहे. अजित पवार आणि आम्ही सगळे नंतर आलो आहोत. त्यामुळे आधी ज्यांना ती पालकमंत्रीपदं दिली आहेत, त्यांची समजूत काढणं, आमच्या लोकांची तिथे नेमणूक करणं यात थोडा वेळ जातोय. पण सामंजस्याच्या माध्यमातूनच मार्ग निघू शकतो. त्यांची अजून चर्चा चालू आहे”, असं भुजबळांनी नमूद केलं. “तिढा सुटेल तेव्हा सुटेल. काही अडलंय का? काम चाललंय, कशाला काळजी करताय?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.