Chhagan Bhujbal On Maratha Reservation Kunbi GR : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यातच कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडींवर बोलताना आता ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य करत एक मोठं विधान केलं. तसेच हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असं वृत्त माध्यमांमध्ये आहे. यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एकतर हा जीआर मागे घ्या, नाहीतर त्या जीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करा’ अशी मागणी छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले?

“मला माध्यमांना सांगायचं आहे की एक बातमी अशी येत आहे की मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जो अर्ज दाखल केला होता तो फेटाळला आणि मराठा समाजाचा मोठा विजय झाला अशा बातम्या येत आहेत. मात्र, माध्यमांनी व्यवस्थित समजून घ्यावं की हा जीआर निघाल्यानंतर अनेकांनी आपआपल्या पद्धतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यातील काही लोकांनी जनहित याचिका दाखल केली होती. आम्ही त्यांना सांगितलं की हे चुकीचं होईल. त्यानंतर आम्ही वकिलांबरोबर ८ ते १० दिवस चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला जनहित याचिका नाही तर रिट याचिका दाखल करायची. मग ज्यांनी जनहित याचिका केली होती त्यांनी रिट याचिका दाखल करण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा न्यायालयाने सांगितलं की आम्ही ही याचिका फेटाळतो आणि तुम्ही रिट याचिका दाखल करा. पण काही बातम्यांमुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरत आहे”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.

“आम्ही आतापर्यंत चार ते पाच रिट याचिका दाखल केलेल्या आहेत. एक कुणबी सेनेच्यावतीने, नाभिक समाजाच्यावतीने, माळी महासंघाच्यावतीने, समता परिषदेच्यावतीने अशा वेगवेगळ्या पाच ते सहा रिट याचिका दाखल केल्या आहेत. आता त्याची सुनावणी देखील लवकरच सुरू होईल. अतिशय काळजीपूर्वक आपण या प्रकरणाच्या संदर्भात वकील नेमले आहेत. मला खात्री आहे की आपली मागणी आहे की एकतर हा जीआर मागे घ्या, नाहीतर त्या जीआरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करा. यामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळेल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.