नाशिक, त्र्यंबकेश्वर, कावनई, सप्तशृंगी गड ही ठिकाणे सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळाविषयक विकास कामांच्या तयारीला लागावे तसेच विकास कामांचे प्राधान्याने नियोजन करण्याचे निर्देशही भुजबळ यांनी दिले. २०१५-१६ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर, जिल्हाधिकारी विलास पाटील, पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, महापालिका आयुक्त संजय खंदारे, पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जी कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या कामांची प्राथमिक तयारी व कामांची वर्गवारी करून आवश्यक कामे सुरू करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. आपापल्या विभाागाच्या अंदाजपत्रकात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्याकरिता आपल्या मुख्यालयाला प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देशही त्यांनी दिले. नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, कावनई, सप्तशृंगी गड या ठिकाणी सिंहस्थात गर्दी होत असते. दूरवरून येणारे भाविक या ठिकाणी हमखास भेट देतात. या ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था सद्य:स्थितीत योग्य नसल्याने रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करावीत. याशिवाय आरोग्य सेवा, पिण्याची पाणीपुरवठा योजना, आवश्यक सेवा सुविधांचे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासून नियोजन करावे, असेही भुजबळ यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्ह्यातील पर्यटनविषयक प्रस्तावित विकास कामांचा आढावाही त्यांनी घेतला. पोलीस विभाग, महानगरपालिका, जलसंपदा, रेल्वे, एसटी महामंडळ आदी विभागांनी सिंहस्थ कुंभमेळाविषयक नियोजन, कामकाजांची माहिती पालकमंत्री भुजबळ यांना सादर केली.