मराठा आरक्षणावरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील सातत्याने आमने-सामने येत आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिकच्या येवला शहरात प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, मी एकटा मराठा आरक्षण अडवू शकत नाही. मराठा आरक्षणाबाबत प्रसारमाध्यमांनी शरद पवार, महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न विचारायला हवा.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांना प्रश्न विचारण्यात आला की मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? यावर छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही हा प्रश्न मलाच का विचारता? हे आरक्षण देता येईल का? हे तुम्ही शरद पवारांना विचारा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा किंवा सगळ्या काँग्रेस नेत्यांना विचारा. मी तर एकटाच आहे. मंत्रिमंडळ फार मोठं आहे. वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते आहेत, त्यांना विचारा. एकट्या छगन भुजबळला काय विचारता?

छगन भुजबळ म्हणाले, एकटा छगन भुजबळ मराठा आरक्षण अडवू शकतो का? शासकीय स्तरावर, राजकारणात एकटा छगन भुजबळ ही गोष्ट अडवू शकतो का? मी जर म्हणालो, मराठा समाजाला ओबीसीमधून नाही, वेगळं आरक्षण द्या. परंतु, बाकीच्या सगळ्यांनी ठरवलं तर माझं काही चालेल का? कसं चालेल? राज्यात अनेक नेते आहेत. मराठा समाजाचे नेते आहेत, समजूतदार नेते आहेत त्यांना विचारा. त्यांना सांगा आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल तर सोडवा.

हे ही वाचा >> “…तर १०,००० कोटी रुपये वाचले असते”, मेट्रो कार डेपोच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, तुम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न नेहमी मलाच विचारता. त्यामुळे ते मनोज जरांगे पाटील सारखं छगन भुजबळ, छगन भुजबळ करतात. कारण तुम्ही बाकीच्यांना विचारत नाही. इतरांना न विचारता फक्त मलाच विचारता, महाविकास आघाडीलाही हा प्रश्न विचारा. त्यांचं मत बाहेर येऊ द्या.