Chhagan Bhujbal : मंत्रिपद डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी पक्षावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. हे नाराजीनाट्य अद्याप संपलेलं नसून शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनातही त्यांनी अल्पकाळच हजेरी लावली. तेही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विनंतीनंतर ते अधिवेशनात आले होते. दरम्यान, आज (१९ जानेवारी) त्यांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला. याठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतर्गत बदल झाले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्षांतर्गत बदल झाले पाहिजेत, अशी भूमिका अनेक नेत्यांनी व्यक्त केली. या भूमिकेबाबत छगन भुजबळांना आज विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “माझं मत असं आहे की जे काम करू शकत नाहीत, जे कार्यरत नाहीत, असे लोक सापडले तर बदल झाला पाहिजे. पक्षाचं पार्लिमेंटरी बोर्ड तयार झालं पाहिजे. यात महत्त्वाचे निर्णय म्हणजेच आमदार आणि खासदारांच्या उमेदवारीचे निर्णय घेतले गेले पाहिजेत. जिल्हावार समित्या तयार झाल्या पाहिजेत. जिल्हा परिषद आणि महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. या समित्यांमध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक असतील. या समित्यांकडून योग्य प्रकारे निवड केली जाईल. या गोष्टी असणं आवश्यक आहेत. सामूहिक निर्णय घेतले पाहिजेत.”

पक्षात एकाधिकारशाही

शिर्डीतील अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले,  ‘शिबिराचे नावच अजितपर्व ठेवले आहे, यावरून काय ते कळून घ्या, पक्षात एकाधिकारशाही झाली आहे. मी स्पष्ट बोलतो त्याची शिक्षा मला मिळाली’, असा आरोप भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिवेशनास सुरुवात झाल्यावर अजित पवार – छगन भुजबळ समोरासमोर आले. मात्र दोघांत कोणतेही संभाषण झाले नाही. भुजबळ यांनी काही वेळ अधिवेशनाच्या सभामंडपात हजेरी लावत नंतर ते बाहेर पडले. या वेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी पक्षनेतृत्वावर हल्ला चढवला. सुनील तटकरे यांनी शिबिराला येण्याचा आग्रह केल्याने मी शिबिराला आलो आहे. मी ठाकरेंच्या शिवसेनेतही होतो, तेथेही एकाधिकारशाही होती. मात्र तेथे ११ जणांचे मत विचारात घेतले जायचे. शरद पवारांच्या पक्षातही मी होतो. ते निश्चितच यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. तिथे सगळ्यांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जायचा. काँग्रेसमध्ये तर संसदीय समितीच निर्णय घेते. आमच्या पक्षात कुणाचाच विचार घेतला जात नसल्याची नाराजी व्यक्त केली.