MVA on Chhatrapati Shivaji Statue Collapse: सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकारण पेटले आहे. आज राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते गेल्यानंतर तिथे भाजपाचे खासदार नारायण राणे आणि भाजपाचे नेतेमंडळी पोहोचली. यामुळे राजकोट किल्ल्यावर दोन तास तणाव निर्माण झाला होता. या घटनेवर आता महाविकास आघाडीने ताशेरे ओढले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात एकप्रकारची अस्वस्थता आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचार वाढत आहे. त्यातच सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. महायुतीला जेवढी इंजिन लावले, तेवढा भ्रष्टाचार वाढत आहे. आज मालवण येथील राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीकडून पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन घेण्यात आले आहे. मात्र तिथे शिवद्रोही लोक आडवे आले. महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१ सप्टेंबर रोजी मविआचे आंदोलन

राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. “१ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हुतात्मा स्मारकाला वंदन करून गेट वे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन केले जाणार आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यात सहभागी असणार असून राज्यातील शिवप्रेमींनी यात सामील व्हावे”, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.