गिरीश कुबेर, अमोल पालेकर, अच्युत गोडबोले यांना छाया-प्रकाश फाऊंडेशनचा पुरस्कार

१० डिसेंबर रोजी सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा

(संग्रहित, प्रातिनिधिक छायाचित्र)

सोलापूरच्या छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांना सामर्थ्यवान पत्रकारितेसाठी ‘सव्यसाची पत्रकार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमोल पालेकर यांना ‘कलाकौस्तुभ’ पुरस्कार तर मूळचे सोलापूरचे चतुरस्त्र लेखक अच्युत गोडबोले यांना ‘अभिवंदन’ पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रूपये आणि मानपत्र असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या १० डिसेंबर रोजी सोलापुरात पुरस्कार वितरण सोहळा आयोजिला आहे.

छाया-प्रकाश फाऊंडेशनच्यावतीने पुष्पा आगरकर यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत तिन्ही पुरस्कार मानक-यांची घोषणा केली. १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता बालाजी सरोवर पंचतारांकित हॉटेलमध्ये निमंत्रितांच्या उपस्थितीत हे पुरस्कार वितरीत होणार आहेत. अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात गिरीश कुबेर, अमोल पालेकर व अच्युत गोडबोले या तिन्ही पुरस्कार मानक-यांसह मारूती चित्तमपल्ली आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अजित शहा यांच्या दिलखुलास गप्पाही रंगणार आहेत. दै. दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे हे या दिलखुलास गप्पांमध्ये संवादक असतील.

याच समारंभात सोलापूरच्या जिव्हाळा अपंगमती विकास संस्थेला एक लाख रूपये आणि मानपत्र असलेला ऊर्जा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच पंढरपूरच्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित ‘पालवी’ प्रकल्पाला ७५ हजार रूपये आणि मानपत्र अशा स्वरूपाचा दुसरा ऊर्जा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या दोन्ही स्वयंसेवी संस्थांशिवाय शालेय अध्यापन क्षेत्रात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल खुशालद्दीन शेख (जिल्हा परिषद शाळा, जवळा, सांगोलकर वस्ती, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि ज्योती रमण नकाते (जिल्हा परिषद शाळा, उपळाई बुद्रूक, ता. माढा, जि. सोलापूर) यांना गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येकी ५० हजार रूपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारंभाच्या मध्यंतरानंतर अमोल पालेकर दिग्दर्शित ‘धूसर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
यापूर्वी लेखक प्रा. निशिकांत ठकार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांना छाया-प्रकाश फाऊंडेशनने ‘अभिवंदन’ पुरस्कार देऊन गौरविले होते.

दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा केंद्रीय विधी आयोगाचे माजी अध्यक्ष अजित शहा यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ ‘छाया-प्रकाश फाऊंडेशन नव्या दिल्लीत उभारले आहे. त्यांचे वडील प्रकाश शिवलाल शहा यांनी सोलापूर व मुंबईत प्रदीर्घकाळ वकिली व्यवसाय केला. ते काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीही होते. तसेच त्यांनी राज्याच्या लोकायुक्तपदाचीही धुरा सांभाळली होती. तर मातोश्री छायाताई या सोलापुरातील प्रतिष्ठित निंबर्गीकर घराण्यातील रावसाहेब निंबर्गीकर यांच्या कन्या होत. सोलापूरशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी आणि सोलापूरचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाला हातभार लागण्यासाठी हे फाऊंडेशन कार्यरत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, संशोधन अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांना या फाऊंडेशनकडून प्रत्येकी ५० हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्या तीन वर्षांत ९४ विद्यार्थ्यांना २१ लाखांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhaya prakash foundation award to girish kuber amol palekar achyut godbole msr

ताज्या बातम्या