शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून अभिवादन केलं आहे. फडणवीस यांनी आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांचा एक व्हिडीओ ट्विट केला असून, बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण शिवसेनेला करून दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं  भाजपापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथमच फडणवीस यांनी शिवसेनेला बाळासाहेबांनी सांगितलेल्या हिंदुत्वाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहताना ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात फडणवीस यांनी स्वतः मनोगत व्यक्त केलं आहे. “हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून ज्यांच्याकडं बघता येईल, असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचारानं ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांचं भाषणही दाखवलं आहे. “जोपर्यंत तुमचा स्वाभिमान जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. नाहीतर रसातळाला चाललंय. नावाला जपा. नाव मोठं करा. एकदा का नाव गेलं की, परत येत नाही. हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आणि सातत्यानं आसमानात फडकत राहिला पाहिजे,” असं आवाहन करणारा बाळासाहेबांचा संवाद यात आहे.

बाळासाहेबांना आदरांजली वाहताना त्यांच्याच भाषणाचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला स्वाभिमान आणि हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister devendra fadnavis reminds hindutva to shiv sena while paying tribute balasaheb bmh
First published on: 17-11-2019 at 09:31 IST