सुरक्षिततेबरोबरच विकास प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही; पुरामुळे दरवर्षी निर्माण होणाऱ्या समस्येची दखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर/ गडचिरोली सरकारच्या कामांचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीत मुक्काम केला होता. असे करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्र्यांच्या या मुक्कामामुळे सरकारच्या लेखी गडचिरोलीला महत्त्व असल्याचा संदेश गेला असून दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या या जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा उभारण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे गडचिरोलीवासीयांना सकारात्मक बदलांची आशा वाटू लागली आहे.

गडचिरोलीत दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे भामरागड व आसपासच्या भागाचा उर्वरित महाराष्ट्राशी संपर्क तुटतो. त्या भागात दूरध्वनी सेवेपासून रस्ते-पुलांची व्यवस्था यथातथा असल्याने ते नेहमीचे चित्र झाले आहे. या पाश्र्वभूमीवर महाजनादेश यात्रेवर निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी गडचिरोलीत गावकरी-नागरिकांच्या गाठीभेटी-सभा घेतल्याच, पण त्याचबरोबर रात्री गडचिरोलीत मुक्कामही केला. नक्षलग्रस्त गडचिरोलीत यापूर्वी दिवंगत आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना त्यांनी मुक्काम केला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोलीत मुक्काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री ठरले.

गडचिरोलीत मुक्कामाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, जाणीवपूर्वकच गडचिरोलीत मुक्काम ठेवला. राज्याचा मुख्यमंत्रीच जर गडचिरोलीत एक रात्र मुक्काम करू शकत नसेल तर काय उपयोग. लोकांना गडचिरोली सुरक्षित कशी वाटणार. त्यामुळे आता गडचिरोली बदलत आहे. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होत आहे. हे ठिकाण सुरक्षित होत आहे हा संदेश देण्यासाठीच गडचिरोलीत मुक्काम केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर पावसाळ्यात दरवर्षी पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या भागात संपर्काची साधने, दळणवळण व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उद्योगांना सवलती

गडचिरोलीतील प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार असून या भागात उद्योग उभे राहावेत यासाठी विशेष सवलतीच्या दरात जमिनी देण्याबाबत सरकार निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम व त्यांचे आश्वासन पाहता लवकरच गडचिरोलीत प्रशासन पातळीवर कामांना वेग येण्याची अपेक्षा आहे.

ढाब्यावर चहा

आम्ही लहान असताना धानाच्या रोवणीसाठी असेच शेतातल्या चिखलात उतरायचो.. खूप मजा यायची.. गोंदिया-गडचिरोली रस्त्यावर दुतर्फा सुरू असलेल्या भाताच्या रोवणीची शेतकऱ्यांची लगबग पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात भूतकाळाच्या आठवणी जाग्या झाल्या. थोडय़ाच वेळात चहाची तल्लफ आली आणि आदेश सुटला.. गाडी थांबवा, मोकळ्या हवेत चहा घेऊ जरा.. नक्षलवाद्यांची ये-जा असलेल्या जंगलाच्या परिसरात बिनधास्तपणे ढाब्यावर चहा घेत बसलेल्या फडणवीस यांना पाहायला-भेटायला आजूबाजूच्यांनी गर्दी केली. भाताची रोवणी करण्यात गुंतलेले शेतकरी-महिला कौतुकाने क्षणभर काम थांबवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून हात हलवत होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister devendra fadnavis stayed in gadchiroli zws
First published on: 10-08-2019 at 04:06 IST