महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्लीतील नेत्यांची भेट घेतील. यादरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सावा’निमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. सोबतच निती आयोगाचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा- “उद्धव ठाकरे १५ दिवसांत देणार होते राजीनामा,” दीपक केसरकरांच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “तीन पक्ष…”

८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ८ ऑगस्टला याबबत सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचे सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा- तेजस ठाकरे राजकारणात खरंच सक्रिय होणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “तो…”

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने आता तरी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरतो का हे पाहण महत्वाचं आहे.