scorecardresearch

Premium

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ‘प्रतापगड’च्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकर परिसरात शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

shivrajyabhishek raigad fort
(किल्ले रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती.)

अलिबाग : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकर परिसरात शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते किल्ले रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळय़ादरम्यान बोलत होते. रायगडप्रमाणे प्रतापगडाच्या संवर्धनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून माजी खासदार उदयनराजे भोसले असतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.

लंडनच्या संग्रहालयात असलेली भवानी तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. या पाठपुराव्याला यश येईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य सरकार शिवाजी महाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून काम करत आहे. एक लोकाभिमुख शासन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते या वेळी म्हणाले.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीतून केली. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे, हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिले. न्यायप्रिय राजे म्हणून ते ओळखले गेले. त्यांनी दिलेले जलसंधारणाचे धडे आजही उपयोगी पडत आहेत. त्यांनी वनसंवर्धन आणि जलसंवर्धनाच्या केलेल्या कामांचे अनुकरण केले तर आजही आपण पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम करू शकतो, असा विश्वास या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दिल्ली येथे शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराजांच्या जीवनावरील गॅझेटियर प्रकाशित करण्यात आले. याशिवाय तंजावर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास होण्यासाठी पाच कोटी रुपये दिले असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

खासदार तटकरे यांची नाराजी

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे किल्ले रायगडावर उपस्थित होते. मात्र यावेळी झालेल्या कार्यक्रमात तटकरे यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे ते नाराज होऊन कार्यक्रम अध्र्यावर सोडून निघून गेले. ‘‘मी एक शिवभक्त नागरिक म्हणून इथे आलो होतो. शिवराज्याभिषेक सोहळा पूर्ण होईपर्यंत मी शिवभक्त मावळा म्हणून उपस्थित होतो. पण नंतरचा कार्यक्रम जरा राजकीय होता. मी या विभागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करतो. एक शिवभक्त म्हणून माझ्या भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्याची राजशिष्टाचारानुसार असणारी माझी संधी का डावलली गेली? मला माहिती नाही’’, असं तटकरे म्हणाले.

शिवरायांनी स्वराज्याचा दृष्टीकोन दिला- पंतप्रधान

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासन, राष्ट्रकल्याण, लोककल्याणाचा मार्ग दाखवला. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकारले. कठीण काळात जनतेत आत्मविश्वास जागवला. सैन्य नेतृत्वाचे गुण त्यांनी शिकवले. राष्ट्रनिर्माणाचा दृष्टिकोन दिला. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. त्यांनी आरमाराचे महत्त्व जाणले. त्यांनी जलदुर्गाची निर्मिती केली. आजही जलदुर्ग अढळपणे टिकून आहेत. महाराजांनी एकता आणि अखंडता यांना प्राधान्य दिले. आज शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेत पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाने नवी चेतना, नवी ऊर्जा दिली आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा त्या काळातील एक अद्भुत आणि विशेष अध्याय आहे. महाराजांनी आक्रमकांच्या विरोधात लढाच दिला नाही, तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अद्भुत होते. त्यांनी स्वराज्यही स्थापन केले आणि सुराज्यही स्थापन केले, या शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या दृकश्राव्य संदेशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

१८ हजारांहून अधिक शिवभक्तांची गडावर हजेरी

ढोल-ताशांचा गजर, वैदिक मंत्रोच्चार आणि शंखनाद यांच्या गजरात रायगड किल्ल्यावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार उत्साहात साजरा करण्यात आला. या १८ हजार शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. ल्ल संपूर्ण रायगड शिवभक्तांच्या उत्साहाने फुलून गेला होता.

शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे औचित्य साधून किल्ल्यावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिरकाई देवीच्या पूजनाने या सोहळय़ाला प्रारंभ झाला. त्यानंतर जगदीश्वर पूजन करण्यात आले. सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंचामृत, सप्तगंगा स्नान अभिषेकानंतर महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण व सुवर्णमुद्राचा अभिषेकही करण्यात आला.

रायगड पोलिसांच्या वतीने यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना सशस्त्र सलामी देत मानवंदना देण्यात आली, तर प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी महाराजांच्या पालखीचे भोई झाले होते.

या चैतन्यमय सोहळय़ासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. पालखी सोहळय़ानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळय़ाचा समारोप झाला. मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. तलवार, दांडपट्टे चालवून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोल ताशाचा गजरही करण्यात आला. शिवाजी महाराजांचा महिमा सांगणारे पोवाडे यावेळी शाहिरांनी सादर केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde announcement of shiva shrishti at the base of raigad fort amy

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×