राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उचलून धरला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय शिवरायांचा अपमान करणाऱ्यांसोबत न राहता मुख्यमंत्री शिंदेंनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे, असंही वारंवार म्हटलं जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

हेही वाचा – “ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “या राज्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे मी यापूर्वीही माझं मत मांडलेलं आहे आणि आता जे काय सुरू आहे, गेली चार-पाच महिन्यांमध्ये जे काय आमचं खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेना-भाजपा युतीचं सरकार काम करतय, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, धडकी भरली आहे की आता काय होणार पुढे? आणि सगळे जे काय प्रकार आहेत, ते त्यातूनच पुढे येत आहेत.”

नक्की पाहा – PHOTOS : छत्रपती शिवरायांबद्दल राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदींनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत आक्रमक, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांचे विचार मोडूनतोडून टाकणाऱ्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे का? सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली. यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही.” असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत.