राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पावले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धक आणि गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दुर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.

इथे पाठवा आपल्या सूचनाः

दुर्गप्रेमींना दुर्गसंवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मेल आयडीवर पाठवता येणार आहेत. मुख्मंत्री म्हणाले, दुर्गसंवर्धनासमोरच्या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल.

आणखी वाचा- पंतप्रधानांनीही ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नसेल; दिल्ली भेटीवर संजय राऊतांचं खास भाष्य

पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. गड किल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गड किल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल याकडे लक्ष द्यायला हवे.

गड किल्यांच्या पायथ्याशी त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांच्या वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackrey instructed trekker to come forward for preservation of forts in maharashtra vsk
First published on: 13-06-2021 at 15:29 IST