विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधकांची घोषणाबाजी आणि कामकाजातील संकेतभंगाच्या घटनामुळे गाजला. राष्ट्रगीत न होताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधान परिषदेचे कामकाज नऊ मार्चपर्यंत स्थगित केल्याने सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणी सभापतींविरोधात राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे परिषदेचे सभागृह नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांनी सभापतींच्या दालनाबाहेर याविरोधात गोंधळ घातल्यानंतर रामराजे निंबाळकर यांनी पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू करून राष्ट्रगीत लावण्यास सांगितले आणि पुन्हा कामकाज तहकूब केले. सभापतींच्या या कृतीविरोधातही खडसे यांनी आक्षेप घेतला. सभापतींनी कोणत्या अधिकारात पुन्हा कामकाज सुरू केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवट हा राष्ट्रगीताने होण्याचे संकेत आहेत. मात्र, आज दिवसभर विधान परिषदेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही मंत्र्यांच्या उत्तरांवेळी गोंधळ घातला. त्यातच दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सभापतींनी लक्षवेधी सूचना, मंत्र्यांची लेखी भाषणे पटलावर ठेवण्यास सांगितले आणि कामकाज नऊ मार्चपर्यंत स्थगित केले. यावरून सत्ताधारी सदस्यांनी सभापतींच्या दालनाबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राष्ट्रगीत न होताच कामकाज कसे काय स्थगित करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर सभापतींनी पुन्हा कामकाज सुरू करून राष्ट्रगीताची ध्वनिफीत लावण्यास सांगितली आणि ती झाल्यावर कामकाज स्थगित केले. या प्रकारावर खडसे यांनी आक्षेप घेतला. एकदा कामकाज स्थगित केल्यानंतर सभापतींनी कोणत्या अधिकारांत पुन्हा कामकाज सुरू केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्ही सभापतींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण सुरू असताना विरोधकांच्या गोंधळामुळे तालिका सभापतींनी विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केल्याने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करायचे नाही, असा संकेत आहे. मात्र, तालिका सभापती नरेंद्र पाटील यांच्याकडून कामकाज तहकूब करण्यात आल्यामुळे सत्ताधारी सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेमध्ये विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्याशिवाय कामकाज चालू न देण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला होता. शेतकऱ्यांना मदतीवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस उभे राहिल्यावर विरोधकांनी व्हेलमध्ये जमून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सरकारविरोधात यावेळी घोषणा देण्यात येत होत्या. त्याच स्थितीत फडवणीस सरकारची बाजू मांडत होते. पण विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे तालिका सभापती नरेंद्र पाटील यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करण्यात आल्यामुळे सभागृहात अभूतपूर्व स्थिती तयार झाली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी घडल्या प्रकाराबद्दल स्वतःहून दिलगिरी व्यक्त केली. घोषणा देणे हा विरोधकांचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना कामकाज तहकूब करायला नको होते, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी मात्र तटकरे यांचा मुद्दा खोडून काढत दिलगिरी व्यक्त करण्याची काहीही गरज नसल्याचे सांगितले.
विधीमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे सांगितले. आम्हाला आमचे संख्याबळ माहिती आहे. पण आम्ही सुद्धा अविश्वासाचा प्रस्ताव आणू शकतो, असे सांगत विरोधकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रगीताविना विधान परिषदेचे कामकाज स्थगित केल्याने सत्ताधारी संतप्त
अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवट हा राष्ट्रगीताने होण्याचे संकेत आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 23-12-2015 at 12:55 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief ministers speech in legislative council adjournment