सोलापूर जिल्हय़ात बहुतांश भागात गारपीट व वादळी वा-यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तालुक्यातील होळे येथे घरावरील पन्हाळी पत्रे उडाले आणि गारा अंगावर पडल्याने एका पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर देवडे येथे पाळणा ५० फूट उडून पडला. परंतु सुदैवाने पाळण्यातील चिमुकले बाळ बालंबाल बचावले.
होळे येथे अनिल दत्तात्रेय भुसनर यांच्या वस्तीवर वादळी वा-यासह गारपीट होऊ लागली आणि त्यापाठोपाठ अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे भुसनर यांच्या घरावरील पन्हाळी पत्रे उडाले. उघडय़ावर पडलेल्या घरात मोठमोठय़ा गारा पडायला सुरुवात झाली. त्या वेळी सहा महिन्यांच्या मुलाला गारांचा मार लागला. यात त्याचा मृत्यू झाला. तर देवडे येथे घराचे छप्पर उडाले आणि त्यापाठोपाठ घरातील पाळणाही सर्वाच्या देखत पन्नास फूट उंचावर गेला. मात्र सुदैवाने पाळण्यातील सहा महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचले.