चिपळूण – धामणवणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय ६३) यांचा श्वास कोंडून मृत्यु झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्यांना गुदमरुन मारणाऱ्यांमध्ये एकपेक्षा जास्त व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके नेमली आहेत. सहावे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी नेमण्यात आले आहे. मात्र अद्यापही या खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश आलेले नाही.
चिपळूण धामणवणे खोतवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचा मृतदेह गुरूवारी सकाळी त्यांच्याच घरात अर्धनग्न, पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनेची पाहणी केली. प्रथमदर्शनी हा खून असल्याचा पोलिसांना संशय होताच. त्यामुळे पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ञ पाचारण करण्यात आले. जोशी यांना मारताना संशयितांनी हातात हॅण्डग्लोज घातले होते. ते घटनास्थळी आढळून आले. त्याच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.
श्वान रेम्बो हा मृतदेहापासून टेरवमार्गापर्यंत गेला, त्यामुळे मारेकरी जंगलाच्या दिशेने टेरवमार्गे पळाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. जोशी यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून संशयितांनी त्यांचा श्वास कोंडवून ठार मारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर अतिप्रसंगही झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून पुढे आले आहे.
त्या घरात एकट्याच राहत होत्या, त्यामुळे त्यांच्या घरातून संशयितांनी काय काय चोरले हेही स्पष्ट झालेले नाही. मात्र घरातील सामान अस्ताव्यस्थ पडलेले होते. लॅपटॉपमधील हार्डडिस्क संशयितानी काढून नेली आहे. त्यांचा मोबाईल पाण्याच्या बादलीत आढळून आला. पोलिसांनी त्यांच्या सीमकार्डचे सीडीआर तपासून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी जोशी यांच्या घराजवळीच्या सीसीटीव्हीचे व्हीडीआर तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा संशयितांनी मुख्य व्हिडीआरही पळविल्याचे लक्षात आले. जोशी यांच्या नातेवाईकांना तसेच जवळच्या लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले होते. जोशी यांना बाहेर फिरण्याची जास्त आवड होती. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी त्यांचा खून केला का यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.
अप्पर पोलीस अधिक्षक बाबुराव महामुनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून चिपळूणमध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. संशयितांना पकडण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. एक पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. या खूनामध्ये एकपेक्षा जास्त लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आमचा तपास सुरू आहे. लवकरच आम्ही संशयितांना अटक करून गुन्ह्याचा तपास लावू. – राजेंद्रकुमार राजमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण