मागील आठवड्यात अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना रुग्णालयांच्या अवस्थेवरुन केंद्रावर निशाणा साधला होता. त्यांनी या प्रकरणावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं होतं. मात्र केंद्रावर टीका करणाऱ्या राऊत यांना भाजपाच्या महिला नेता चित्रा वाघ यांनी ट्विटवरुन फिल्मी स्टाइल टोला लगावलाय.

नक्की वाचा >> नगर रुग्णालय दुर्घटना : ‘राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत’ म्हणत शिवसेनेनेच केला PM Cares मधील व्हेंटिलेटर्समुळे आग लागल्याचा उल्लेख

चित्रा वाघ यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची मोट बांधण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊतांची तुलना ‘वेलकम’ या चित्रपटामध्ये अभिनेते परेश रावल यांनी साकारलेल्या घुंगरु या पात्राशी केलीय. “सर्वज्ञानी, नगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडताहेत. व्हेंटिलेटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चाललीय. आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाहीये, उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय. उदय शेट्टी आणि मजनूमध्ये त्यांचा घुंगरू सेठ झालाय,” असं ट्विट वाघ यांनी केलंय.

शिवसेनेनं नक्की काय म्हटलेलं…
नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात शनिवारी (६ नोव्हेंबर २०२१ रोजी) सकाळी आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला. नगरमधील आगीच्या दुर्घटनेची नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समितीमार्फत चौकशी केली जाणार आहे. या समितीला ७ दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. असे असतानाच आता शिवसेनेने या मुद्द्यावरुन आरोग्य व्यवस्थेची होरपळ होत असल्याचं म्हणत सरकारने केवळ आश्रू ढाळू नये, असा टोला लगावला आहे. अहमदनगरच्या रुग्णालायमध्ये आग लागलेल्या ठिकाणी पीएम केअर्सअंतर्गत देण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स असल्याचा मुद्दाही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला.

‘सामना’च्या अग्रलेखा लेखामध्ये शिवसेनेने अहमदनगरच्या रुग्णालयात आग लागली तेथे पीएएम केअर्स फंडातून देण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सचाही उल्लेख केलाय. “अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर्स हे पीएम केअर्स फंडातून देण्यात आले होते. ते निकृष्ट दर्जाची होते व त्यामुळेच शॉर्टसर्किट झाले असावे असा संशय आमदार रोहित पवार यांना आहे. आग कशाने लागली व भडकली या संशोधनातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप भडकू नयेत,” असं लेखात म्हटलं होतं.