“ आरोग्य विभागाच्या परीक्षेत दोनदा गोंधळ झालाय ; साहेब…, राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना! ”

दसरा मेळाव्यातील भाषणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला निशाणा.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण वादळी ठरले. या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी भाजपा, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विविध मुद्द्य्यांवरून त्यांनी टीका देखील केली. त्यांच्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. भाजपा नेते आक्रमक झाले असून, कालपासूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून टीका, टिप्पणी सुरू आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ उडाला असून, यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे आता अगोदरच कालच्या भाषणावरून संतप्त झालेल्या भाजपा नेत्यांनी हा परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा देखील उचलून धरला आहे. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली आहे.

“मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलंय.. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना.” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

तसेच, “मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले, तीच परंपरा प्रशासनानं सुरू ठेवलीय. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परिक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांना पुन्हा संधी द्यावी ही आमची मागणी आहे. भोंगळ कारभार, गोंधळी सरकार !” अशी टीका देखील चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

आरोग्य विभाग परीक्षेत पुन्हा गोंधळ – उमेदवारांचा आरोप

आरोग्य विभागातील परीक्षांमध्ये पून्हा हॉलतिकीट आणि केंद्र निवडीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे उमेदवारांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काळ्या यादीत समाविष्ट असणाऱ्या कंपनी यांना परीक्षा घेण्याचा अनुभव नसताना तसेच आरोग्यमंत्री यांनी जाहीर पणे न्यासा कंपनी परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याचे सांगितले होते, तरी देखील त्याच कंपनीद्वारे परीक्षा घेण्याचा हट्टहास का केला? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Health Department Exam : “ स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय ”

२४ ऑक्टोबर २०२१ रोजी पेपर असल्याने दोन सत्रात पेपरचे आयोजन करण्यात आले आहे. पण काही महत्वाच्या अडचणींवर संबंधित कंपनीच्यावतीने काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. जसे की, पेपर दोन सत्रात असल्याने उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे व दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आले आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसताना देखील त्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे.

उमेदवारांना केंद्र निवडण्याचा मूलभूत अधिकार असताना, जे केंद्र उमेदवारांनी निवडली आहेत, ते केंद्र न देता दुसरे लांबचे केंद्र कंपनीच्या वतीने देण्यात आले असून,असे परस्पर केंद्र बदलण्याचा कंपनीला कोणी अधिकार दिला आहे? असा संतप्त सवाल परीक्षार्थ्यांकडून विचारण्यात आला आहे.

उमेदवारांनी दोन परीक्षा साठी फी भरली असून त्यांना जी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ती देखील संधी या कंपनीच्या चुकीच्या व्यवस्थापनेमुळे डावली जाणार आहे. सकाळी एका जिल्ह्यात पेपर आणि दुसरा पेपर त्यात जिल्ह्यात देणे अपेक्षित असताना, दुसरा जिल्ह्यात केंद्र देण्यात आले असून परीक्षेची संधी हिरावून घेण्याचा प्रकार हा कंपनीद्वारे करण्यात आला असून उमेदवारांच्या मूलभूत अधिकारांची गळचेपी केल्याचे निष्पन्न होत आहे. अशी प्रतिक्रिया देखील परीक्षार्थ्यांमधून देण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chitra wagh targets chief minister uddhav thackeray over confusion in health department exams msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या