दहावीच्या परीक्षेतील भरभक्कम गुणांच्या स्पध्रेनंतर बहुतांशी मुलांचा विज्ञान शाखेकडेच ओढा आहे. ७० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांची पहिली पसंती लातूर पॅटर्नच्या महाविद्यालयांना असून, त्यानंतर जिल्हा व तालुका पातळीवरील महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो. निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यात मुलांची विज्ञान शाखेनंतर वाणिज्य शाखेला पसंती असल्याचे दिसून येते. कला शाखेत अनेक संधी असल्या, तरी पुढे शाश्वती नसल्याने या शाखेकडे येणारे विद्यार्थी केवळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीच येत असल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक महाविद्यालयात कला शाखेच्या प्रवेशाने शंभरीही पार केली नाही.
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत या वर्षी ३६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सुमारे दीडशे शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा राखली. उत्तीर्ण झालेल्या बहुतांशी विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडेच असल्याचे दिसून येते. मुलांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीनंतर सीईटी परीक्षेतून मेडिकल- इंजिनिअरिंगसाठी संधी मिळते. यामुळे पालकांचाही ओढा याच शाखेकडे आहे. ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारी मुले बहुचíचत लातूर पॅटर्नच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, या साठी प्रयत्नरत असतात. काही मुले पुण्यात शिक्षणासाठी जातात. विज्ञान शाखेतून डॉक्टर-इंजिनिअर होण्याचा मार्ग जात असल्याने या शाखेकडे जाण्याचा कल मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. परिणामी कला, वाणिज्य शाखांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे.
महाविद्यालयात विज्ञान शाखेला पाचशेपेक्षा जास्त प्रवेश होत असताना, कला शाखेला मात्र शंभरीचा आकडाही गाठला जात नाही. मागील दोन वर्षांपासून विज्ञान शाखेतूनही सीईटीनंतर वैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षणास संधी कमी होत असल्यामुळे मोठय़ा शहरात ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारी मुलेही कला शाखेकडे वळली असल्याचे चित्र आहे. कला शाखेतून प्रशासन सेवेतील स्पर्धा परीक्षांसाठी पूरक अभ्यासक्रम असतो. प्रशासनात वरिष्ठ अधिकारी पदावरील व्यक्तीला समाजात चांगला मान असून गेल्या काही वर्षांत या शाखेकडेही विद्यार्थी आकर्षति झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही विज्ञान शाखेलाच पसंती आहे. या वर्षी विज्ञान शाखेनंतर वाणिज्य शाखेला चांगले प्रवेश झाले. वाणिज्य शाखेतून काही संधी उपलब्ध होत असल्याने या शाखेकडेही मुलांचा कल वाढला. कला शाखेत मोठय़ा प्रमाणात संधी असल्या, तरी त्याबाबत शाश्वती नसल्यामुळे या शाखेकडे मुलांसह पालकांचेही दुर्लक्ष दिसत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2015 रोजी प्रकाशित
विज्ञानानंतर वाणिज्यला पसंती; कला शाखेला मुलेच मिळेनात!
दहावीच्या परीक्षेतील भरभक्कम गुणांच्या स्पध्रेनंतर बहुतांशी मुलांचा विज्ञान शाखेकडेच ओढा आहे. ७० टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांची पहिली पसंती लातूर पॅटर्नच्या महाविद्यालयांना असून, त्यानंतर जिल्हा व तालुका पातळीवरील महाविद्यालयात प्रवेश घेतला जातो.

First published on: 14-07-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice commerce after science no student in art facalty