कराड : कराड तालुक्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच आवश्यक दाखले मिळणार असून, कराड तहसील कार्यालयाकडून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान २०२५-२६ राबविण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कराड तालुक्यातील १३१ शाळांचे मुख्याध्यापक, ४० उच्च माध्यमिक महाविद्यालयांचे प्राचार्य, १४ मंडलाधिकारी, ४६ महा-ई-सेवा केंद्रचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील एकूण १३१ शाळांमधील दहावीचे ७ हजार ९९४ व ४० महाविद्यालयातील ८ हजार ६८७ विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्याकरिता एकूण १६ हजार ६८१ कोरे फॉर्मचे वाटप करण्यात आले.
सदर अभियानांतर्गत उत्पन्नाचे दाखले, रहिवास प्रमाणपत्र (डोमासाईल), जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर आदी दाखल्यांकरिता आवश्यक सर्व कागदपत्र संबंधित शाळांमध्ये स्वीकारून शाळेतच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, महा-ई-सेवा केंद्रचालक व आपले सरकार सेवा केंद्रचालक यांना सदर अभियान राबविण्याकरिता आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी या वेळी दिले. या कामकाजासाठी गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे हे समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
सदर बैठकीस तहसीलदार कल्पना ढवळे, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी शबनम मुल्ला, नितीन जगताप, सर्व मंडलाधिकारी यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी व महा-ई-सेवा केंद्रचालक व आपले सरकार सेवा केंद्रचालक उपस्थित होते.