कर्जत नगरपालिका आणि जनता विद्या मंदिर प्रशाला दहिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छता मोहीम जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर चाललेल्या या उपक्रमांची सांगता विविध स्पर्धानी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
जनता विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात समारोपाच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जयप्रकाश नारायण व पंडित मदनमोहन मालवीय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ निबंध, वक्तृत्व, चित्रकला व रंगावली स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन नगराध्यक्ष राजेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, रायगड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयमांडे, नगरसेविका विनीता घुमारे, कृष्णा लाड, सुदाम म्हसे, भालचंद्र घुमरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक किशोर तेरळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात विद्यालयाला नेहमी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. राजश्री केदार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यानंतर स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना दादाराव अटकोरे यांनी अभियानाचे उत्कृष्टरीत्या नियोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे सूचित केले. विनीता घुमरे यांनीही असे समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम राबविल्यास आपल्या भागाचे स्वास्थ्य चागले राहील असे स्पष्ट केले. विजय मांडे यांनी या शाळेत नेहमीच आगळेवेगळे उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने केले जातात. अनेक वर्षे रखडलेला शाळेच्या जागेचा प्रश्न सुटण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राजेश लाड यांनी ‘मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. शाळेतील शिक्षकांच्या संस्कारमय शिक्षणामुळेच या पदावर येऊन पोहोचलो. शाळेच्या विकासासाठी कधीही हाक मारा माझा मदतीचा हात नेहमीच पुढे राहील,’ असे आश्वासन दिले. सूत्रसंचालन प्रतिभा उपासनी यांनी, तर आभारप्रदर्शन राजश्री केदार यांनी केले. या वेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2015 रोजी प्रकाशित
कर्जत येथे स्वच्छता मोहिम
आठवडाभर चाललेल्या या उपक्रमांची सांगता विविध स्पर्धानी करण्यात आली.
Written by रत्नाकर पवार
First published on: 16-10-2015 at 00:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleaning camping at karjat