लोकसत्ता वार्ताहर

परभणी : पर्यवेक्षकाकडून सहा महिन्याच्या प्रलंबित वेतनातील एका महिन्याचे तीन हजार याप्रमाणे एकूण अठरा हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील मॉडल उर्दू हायस्कूलच्या लिपिकासह मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१९) केली. या प्रकरणात आरोपी श्रीमती सिद्दिकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद (वय ,५७ वर्षे, पद मुख्याध्यापिका, मॉडल उर्दू हायस्कूल,परभणी रा.इनायत नगर,परभणी), बुढन खान महेबुब खान पठाण (वय ५३ वर्षे, पद लिपिक, मॉडल उर्दू हायस्कूल, परभणी रा.अजिजिया नगर, कृषी कॉर्नर,परभणी) यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मॉडेल उर्दू हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या ३५ वर्षीय पर्यवेक्षकाने केलेल्या तक्रारीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली.यातील तक्रारदार पर्यवेक्षक दिनांक १७ मार्च २०२५ रोजी त्यांच्या वर्गात काम करीत असताना बुढन खान पठाण यांनी वर्गात येऊन सांगितले की, तुम्हाला एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्याचे प्रलंबित असणारे वेतन मिळालेले आहे. त्या वेतनातून एका महिन्याचे ३ हजार रुपये असे सहा महिन्याचे एकूण १८ हजार रुपये मुख्याध्यापिका सिद्दिकी अहेमदी यांनी मागितले आहेत. तक्रारदाराने सिद्दिकी अहेमदी यांची भेट घेतली असता त्यांनी सहा महिन्याच्या वेतनातून १८ हजार रुपये उद्या आणून द्या असे म्हटले. अशी लाच मागणीची तक्रार दि.१७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात प्राप्त झाली होती.

दि.१८ मार्च रोजी पंचासमक्ष लाचमागणी पडताळणीमध्ये तक्रारदाराने लाच रक्कम कमी करण्याची विनंती केली. सिद्दिकी अहेमदी यांनी तक्रारदारास तुम्हाला मिळालेल्या सहा महिन्याच्या प्रलंबित वेतनामधून १८ हजार रुपये द्यावे लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली व लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली. बुधवारी (दि.१९) सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार ह्या लाचेची रक्कम सिद्दिकी अहेमदी यांना देण्यासाठी पंचासह मॉडल उर्दू हायस्कूल, परभणी येथे पोहचल्या. तक्रारदाराने अहेमदी सिद्दिकी यांना सांगितले की, आपण सांगितल्याप्रमाणे १८ हजार रुपये आणले आहेत.त्यावर सिद्दिकी अहेमदी यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम बुढन खान पठाण यांच्याकडे देण्यास सांगितली. पठाण यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून १८ हजार रुपये लाचेची रक्कम सिद्दिकी अहेमदी यांच्या सांगण्यावरून स्विकारली. आरोपी बुढन खान महेबुब खान पठाण यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सिद्दिकी अहेमदी मोहम्मद अब्दुल मजीद यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी सिद्दिकी अहेमदी यांच्या अंगझडतीमध्ये रोख रक्कम ९८४० रूपये आणि १ मोबाईल तर आरोपी बुढन खान यांच्या अंगझडती मध्ये लाचेची रक्कम १८ हजार रुपये आणि त्याव्यतिरिक्त ५१९० रुपये आणि एक मोबाईल आढळून आला.आरोपी सिद्दिकी अहेमदी यांंच्या परभणी येथील घरझडतीमध्ये ९ लाख ५० हजार रूपये रोख मिळाले आहेत. आरोपी बुढन खान पठाण यांच्या परभणी येथील घराची झडती घेण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,परभणीचे पोलीस उपअधीक्षक श्री.अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री.अल्ताफ मुलाणी, पोलीस निरीक्षक,श्री. बसवेश्वर जकीकोरे व त्यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.