राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक महत्त्वाच पुस्तक प्रकाशित झाल आहे. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ असं या पुस्तकाचं नाव आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर दिसले. निमित्त होतं देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशनाचं. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना चिमटा काढत ‘आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा,’ असं मिश्किल वक्तव्य केलं. ‘मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं असेल असं सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे,’ असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या पुस्तकाच्या पीडीएफ आवृत्तीची लिंक ट्विट केली आहे. या लिंकवर पुस्तक वाचता येणार आहे. त्याचबरोबर ते डाऊनलोडही करता येणार आहे.

पुस्तक वाचण्यासाठी इथे क्लिक करा – अर्थसंकल्प सोप्या भाषेत

प्रकाशनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. सगळ्या योजनांना अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला अर्थ असला पाहिजे. अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ असू शकत नाही. पण हा इतका मोठा देश आणि राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय असा मोठा प्रश्न असतो,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“आपण जो अर्थसंकल्प मांडतो, तो सगळा पैसा सर्वसामान्यांचा असतो. सर्वसामान्याला कळलं पाहिजे माझ्या पैशाचा वापर कसा करत आहात. मी कर भरतोय त्याचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे. काय कमी होणार, वाढणार आहे हे सर्वसामान्यांना कळलं पाहिजे,” असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.