ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे १४ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्याचे पंचनामे अजून सुरू आहेत, तोवरच आता पुन्हा राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी सुरू आहे. खरीप पिके काढण्याच्या टप्प्यात आली आहेत. प्रामुख्याने विविध प्रकारच्या कडधान्यांची काढणी सुरू आहे, किंवा काढणीच्या टप्प्यात सर्व कडधान्य आली आहेत, अशा स्थितीत पुन्हा पाऊस पडल्यामुळे मूग, उडीद, मटकी, कुळीत सारख्या कडधान्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
शेतातच कडधान्य कुजून जाण्याची शक्यता आहे. मुळात महाराष्ट्रात कडधान्यांचे क्षेत्र झपाट्याने घटत आहे, अशा काळात ग्रामीण भागातील शेतकरी घरगुती वापरासाठी या कडधान्याची प्रामुख्याने लागवड करतात. महाराष्ट्रात मूग, मटकी, उडीद, चवळी, कुळीत या कडधान्याची बाजारात विक्रीसाठी फारशी लागवड होत नाही. त्यामुळे घरगुती वापरासाठी शेतकऱ्यांकडून लागवड झालेल्या पिकांचे असे नुकसान होत असेल तर पुढील हंगामात शेतकरी याकडे पाठ फिरवतो आणि त्या जागी सरधोपटपणे सोयाबीन, मका, कापूस सारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेतो.
त्यामुळे शेतीतील पिकांची वैविध्यता संपुष्टात येते आणि शेतीत तोचतोच पणा येतो. अशा कारणामुळे परागीभवन परिणाम होतो. जमिनीचा कस कमी होतो आणि एकूणच शेती उत्पादनाला फटका बसतो. त्यामुळे शेतीतील विविधता नष्ट करण्याचं काम हवामान बदलामुळे होत आहे.
आता सोयाबीन, कापूस आणि मका हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पिके झाली आहेत आणि ही पिके नगदी आहेत. सध्या कापूस फूल स्थितीत आला आहे. फुलोऱ्यात असलेला कापूस सलग सात, आठ दिवस पाण्यात राहिला तर पिवळा पडतो, कापसाची मुळे कुजू लागतात आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो.
सोयाबीनच्या झाडांची उंची कमी असते, त्यामुळे रानात फूट, दीड फूट पाणी साचलं तरी सोयाबीन पाण्याखाली जाते. सोयाबीन पाण्याखाली गेले की सोयाबीन उत्पादनाला फटका बसतो. सोयाबीनचा रंग काळा पडतो, त्यामुळे बाजारात फारसा भाव मिळत नाही.
दोन वर्षांपासून म्हणजे केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनाला चालना दिल्यापासून महाराष्ट्रात मका लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या मक्याला हवामान बदलाचा इतर पिकाच्या तुलनेत कमी फटका बसतो. आता मका पिक म्हणजे मक्याच्या कणसात दाणे भरण्याची स्थिती आहे. काही ठिकाणी अगाप पेरणी झालेल्या ठिकाणी मका काढणीला आलेला आहे. सरासरी चार महिन्याच्या हे पीक हवामान बदलाला काही प्रमाणात तरी तोंड देऊ शकेल, अशी स्थिती आहे.
हवामान बदल, अतिवृष्टी, गारपीट, अति उष्णता, अति थंडी यापासून संरक्षक करण्यासाठी एकीकडे संरक्षित शेतीचा पर्याय समोर आला आहे. पण हा संरक्षित शेतीचा पर्याय अत्यंत खर्चिक आहे. सध्या शेतीतून मिळणारे दर हेक्टरी उत्पादन आणि शेतीमालाला मिळणारा दर हे पाहता संरक्षक शेतीचा खर्च परवडणारा नाही. शिवाय संरक्षित शेती सर्व पिकाला सरसकट उपयोगी नाही. संरक्षित शेतीमुळे सूर्यप्रकाश, परागीभवन, हवा खेळती राहणे राहण्यावर नियंत्रण येतात.
पीकनिहाय याचा आढावा घेतला तर ते अनेक पिकांना संरक्षित शेती फायदेशीर ठरलेली नाही. त्यामुळे हवामान बदलासमोर शेतीची वाट बिकट आहे, हे नक्की. आता संशोधक हवामान बदलाला सहनशील वाणांची निर्मिती करत आहे, पण ही वाणं सुद्धा कितपत तग धरू शकतील, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करणे आणि पर्यावरणाला पूरक – पोषक अशा पद्धतीनेच शेती आणि शेती पद्धतीचा विकास करणे गरजेचे आहे. अन्यथा हवामान बदलापुढे शेती तग धरू शकणार नाही.