Shobha Fadnavis Targets Sudhir Mungantiwar: चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे. चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी यासंदर्भात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असून थेट उल्लेख न करता सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित राहिल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. यावरूनच शोभा फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यातील किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार यांची अनुपस्थिति होती. त्याबाबत चर्चा चालू असतानाच या कार्यक्रमातल्या भाषणातून शोभा फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचक्या दिल्याचं बोललं जात आहे.

काय म्हणाल्या शोभा फडणवीस?

शोभा फडणवीस यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाबाबतची लोकांमधील प्रतिमा या असल्या प्रकारांमुळे मलीन होऊ शकते, अशी भूमिका मांडली. “आपला पक्ष महाराष्ट्रभरात असताना या जिल्ह्यात पक्षात भांडणं व्हावीत? इथे एवढा मोठा मेळावा आहे, पण ते का मोठ्या मनाने समोर येत नाहीत? का दुसरा मेळावा घेता? यामुळे लोकांच्या मनात काय प्रतिमा निर्माण होते? हा चंद्रपूरचा आमदार आहे. चंद्रपूरला कार्यक्रम घेणं हे त्याचं काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा घेऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी उघडपणे सांगते”, असं शोभा फडणवीस म्हणाल्या.

“भाजपाची काँग्रेस होऊ द्यायची नाही”

दरम्यान, या अशा प्रकारांमुळे भाजपाची काँग्रेस होणार नाही का? असा प्रश्न शोभा फडणवीस यांनी केला आहे. “लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत. लोकांची पक्षात यायला झुंबड लागली आहे. पण जर आपल्यात इथे भांडणं झाली, तर आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणणार नाहीत का? त्यामुळे आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये”, असं त्या म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपला भारतीय जनता पक्ष आपल्याला टिकवायचा आहे. देशाच्या सीमेवर धोके असताना इथे तुम्ही आपापसांत छोट्याशा मान-सन्मानासाठी भांडता? हा मान-सन्मान तुम्हाला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी, जनतेनी दिला आहे. त्यांचा सन्मान करा. फक्त स्वत:चा मोठेपणा जपण्यासाठी कुणीही रडू नये”, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.