CM Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil Protest: मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारो आंदोलकांसह मुंबईच्या आझाद मैदान परिसरात आंदोलनासाठी बसले आहेत. मुंबईत आंदोलकांनी गर्दी केल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच आंदोलकांना सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत, असाही आरोप विरोधकांनी केला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. आज सकाळी आंदोलक मुंबईत आले. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. मात्र पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.

आंदलोनाला गालबोट लागू नये

“उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार सरकार सर्व काही मदत देईल. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो, तसा फटका वाहतुकीला बसताना दिसत आहे. काही अतिउत्साही लोकांमुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागते. पण अशाप्रकारे कुणी वागू नये, याकडे लक्ष द्यावे लागेल. मनोज जरांगे पाटील यांनीही अलोकतांत्रिक आणि आडमुठे पद्धतीने वागू नये, असे आवाहन केलेले आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे किती दिवस आंदोलन चालणार? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली होती. मात्र त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पोलीस पालन करतील. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील हा प्रश्न आहे.

आम्हीच आरक्षण दिले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. मागच्या १० वर्षांच्या युतीच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या योजनाही आमच्या काळात आल्यात. मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मकच आहोत.”

विरोधकांचे तोंड भाजेल

“काही लोक जाणीवपूर्वक आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण कसे लागेल? असा प्रयत्न केला जात आहे. सकाळपासून काही लोकांची विधाने मी ऐकली. त्यांचे प्रयत्न आमच्या लक्षात येत आहेत. आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचे तोंड भाजेल. हे मला सांगायचे आहे”, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सोयीची भूमिका घेऊ नका. ठाम भूमिका घ्या. जे कायदेशीर आहे, ते होईलच. पण विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत. कारण त्यांना समाजा समाजात भांडणे लावून राजकीय लाभ घ्यायचा आहे. आम्हाला मात्र कोणत्याही समाजाला नाराज करायचे नाही. आम्ही सर्व समाजाच्या इच्छा समजून घेत आहोत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.