CM Devendra Fadnavis on Maratha Protest: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून आझाद मैदान येथे उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती. तसेच केवळ पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल, असे सांगितले गेले होते. प्रत्यक्षात असंख्य मराठा आंदोलक आज मुंबई परिसरात दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

लोकांना त्रास होईल असे वागू नका

आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत. आज सकाळी आंदोलक मुंबईत आले. मुंबईत काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचे प्रकार घडले. मात्र पोलिसांनी समजूत घातल्यानंतर आंदोलक बाजूला झाले. जरांगे पाटील यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शासनाचीही सहकार्याची भूमिका आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन होत असेल तर त्याला कुठलीच मनाई नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, असा सरकारचा प्रयत्न आहे. मागच्या १० वर्षांच्या युतीच्या काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. शिक्षण आणि रोजगाराच्या योजनाही आमच्या काळात आल्यात. मराठा आरक्षणासाठी आम्ही सकारात्मकच आहोत.”

शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे, त्यांचे काम किती झाले आहे? याची सर्व माहिती आम्ही वेळोवेळी दिले आहेत. मंत्रिमंडळाने तयार केलेली ही समिती असल्यामुळे त्यांना अधिकार आहेत. असे असतानाही लोकांना त्रास होईल, असे कुणी वागू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आंदोलनाला वाढीव मुदत मिळणार?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे किती दिवस आंदोलन चालणार? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली होती. मात्र त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पोलीस पालन करतील. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील हा प्रश्न आहे.