राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. अशा परिस्थितीत अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही. शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच दोन दिवसांमध्ये राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री उशीरा नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात दाखल झाले. या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.

अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद तसंच सत्तेतील समसमान वाटपाच्या आपल्या मागणीबाबत शिवसेना अद्यापही ठाम आहे. परंतु शिवसेनेला काही महत्त्वाची मंत्रिपदं तसंच मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपाकडून स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक भूमिका घेत पर्यायी सत्तास्थापनेचे संकेत दिले होते. दरम्यान, ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भाजपाच्या नेतृत्वाची भेट घेतली. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची फडणवीस यांनी भेट घेत चर्चा केली.

दरम्यान, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अपेक्षित होती. परंतु मुख्यमंत्र्यांना मोदींची भेट मिळू शकली नाही. दरम्यान, त्यानंतर मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यात माघाआघाडीचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसंच आमचे दरवाजे २४ तास उघडे असून शिवसेनेनं प्रस्ताव द्यावा असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री ९.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली व त्यांना सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींबाबत माहिती दिली. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही प्रतिक्रिया दिली नाही. राज्यातील ही कोंडी फोडण्यासाठी आता संघ महत्त्वाची भूमिका बजावेल का हे पहावं लागणार आहे.