Devendra Fadnavis on Nishikant Dubey : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे हे मराठी-अमराठीच्या वादावर चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्तर प्रदेश, बिहारला आल्यावर आपटून-आपटून मारू (पटक पटक के मारेंगे) असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी दुबे यांना प्रत्युत्तर देत “तू मुंबईत ये, तुला समुद्रात बुडवून मारू (डुबा डुबा के मारेंगे)”, अशा प्रकारचं विधान केलं होतं.
त्यानंतर आता पुन्हा एकदा निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. ‘महापालिका निवडणुकीनंतर ठाकरेंचं महाराष्ट्रातील राजकारण संपणार’, अशा प्रकारचं विधान दुबे यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत निशिकांत दुबे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ‘निशिकांत दुबे यांनी अशा प्रकारची वक्तव्य करण्याची गरज नाही. आम्ही येथील परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहोत’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“माझं असं स्पष्ट मत आहे की निशिकांत दुबे यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. आम्ही येथील परिस्थिती सांभाळण्यासाठी सक्षण आहोत. येथील मराठी माणूस देखील सुरक्षित आहे आणि अमराठी माणूस देखील सुरक्षित आहे. महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी असा कुठेही वाद नाही. पण काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांना मराठी आणि अमराठी लोक निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे निशिकांत दुबे यांना माझा सल्ला असा आहे की त्यांनी या विषयासंदर्भात कोणतंही वक्तव्य करू नये”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
निशिकांत दुबेंना महिला खासदारांनी विचारला होता जाब
राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन ‘मराठी माणसा’ला डिवचणारे भाजपा खासदार निशिकांत दुबेंना बुधवारी मराठी खासदारांनी काही दिवसांपूर्वी अद्दल घडवली. संसदभवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संसदभवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला होता.
मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे’ असे आव्हान दुबे यांनी दिले होते. भाजपच्या या वाचाळवीर खासदाराला बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला होता.