Devendra Fadnavis on Operation Sindoor: भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत एअर स्ट्राईक करून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईनंतर संबंध देशभरातून समाधान व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कारवाईवर आनंद व्यक्त केला असून भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन व्यक्त केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले आहेत. या कारवाईचे संपूर्ण शुटिंग करण्यात आले असल्यामुळे यावेळी कुणाला पुरावा मागण्याकरिता जागाच उरली नाही. मला असे वाटते की, सर्व भारतीयांकरिता अभिमानाचा असा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला भारत सहन करणार नाही. भारत योग्य पद्धतीने बदला घेईल, हे आपण दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अधिक बोलके आहे, असे मला वाटते.”
मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, अतिरेक्यांचे आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर सकाळी १०.३० च्या सुमारास भारतीय लष्कराच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यात ऑपरेशन सिंदूरसंदर्भात माहिती दिली. या मोहिमेमध्ये पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या हद्दीतील नेमक्या कोणत्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले, त्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी मोहिमेची माहिती देताना प्रत्येक मुद्द्यावर लष्कराची सविस्तर भूमिका मांडली. तसेच, या तळांमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाईंड, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे म्होरके यांना जिथे प्रशिक्षण दिलं, अशा दहशतवादी तळांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.