Devendra Fadnavis : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. दरम्यान, हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून न्यायालयाच्या निर्देशाचं प्रशासन पालन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मी प्रवासात असल्यामुळे उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे हे पूर्ण ऐकलं नाही. मात्र, मला जे समजलं त्यात उच्च न्यायालयाने हेच सांगितलं आहे की आंदोलनासाठी जी परवानगी होती, ती परवानगी काही अटी शर्तींसह होती. मात्र, या अटी शर्तींचं उल्लंघन झालेलं आहे. विशेषत: रस्त्यावर ज्या गोष्टी सुरू आहेत, त्याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे आणि न्यायालयाने त्याबाबत काही निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करणं प्रशासनाला क्रमप्राप्त आहे आणि प्रशासन न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करेन”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
बैठकीत काय चर्चा झाली?
“बैठकीत आम्ही सर्व कायदेशीर मार्गांचा विचार केला. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काही मार्ग काढता येतील का? तसेच कायदेशीररित्या ते न्यायालयात कसे टिकतील? या संदर्भातील चर्चा झाली आहे. त्याबाबत आम्ही अधिकची काही माहिती मागवली आहे. कायदेशीर काही मार्ग निघत असतील तर कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता आहे. त्यावर आम्ही काम करत आहोत”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पत्रकारांवर हल्ला झाल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे अतिशय चुकीचं आहे. पत्रकारांवर हल्ला आणि महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन आणि विनयभंग हे आंदोलनाला गालबोट लावणारं आहे. कारण आपण ३० पेक्षा जास्त मराठा मोर्चे पाहिलेले आहेत. त्या मोर्च्यांची शिस्त पाहिलेली आहे. त्यानंतर सरकारने सकारात्मक केलेला निर्णय देखील आपण पाहिला. त्यामुळे पत्रकारांवर अशा प्रकारे हल्ला होणं या घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणाऱ्या नाहीत.”
“काही ठिकाणी बंद आणि रास्ता रोको झाले. पण त्या ठिकाणी लगेचच पोलिसांनी ते रस्ते रिकामे केले. तसेच काही घटना अशा घडल्या की त्या घटना भूषणावह नाहीत. अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडून नाही. त्याच समर्थन होऊ शकत नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे लोक आहोत. उच्च न्यायालयानेही या आंदोलनाची माहिती घेतली. सरकारचाही हा प्रयत्न असतो की कोणत्याही गोष्टी सामंजस्याने झाल्या पाहिजेत. पण न्यायालयाने कडक आदेश दिल्यानंतर आता प्रशासनाने ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती कारवाई प्रशासनाला करावी लागेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.