Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Muder Photos: संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता तीन महिने होत आहेत. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीच्या शेवटी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच आरोपींची जवळीक असल्याचा आरोप करत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांनी घेरले होते. ४ मार्च रोजी त्यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला. दरम्यान ३ मार्च रोजी संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी काढलेले फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून अनेकांनी हळहळ आणि तीव्र संताप व्यक्त केला होता. सदर फोटो मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आधीच पाहिले असावेत, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून विरोधकांनी दोषारोप केले. पण तपास नेमका कसा झाला? याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले, तेव्हाच यांची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल, असे मी सांगितले होते. सीआयडीच्या तपासात कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही, असेही स्पष्ट निर्देश दिले होते. पूर्ण ताकदीनिशी तपास करा, असेही सीआयडीच्या पथकाला सांगितले होते.”

सीआयडीने उत्कृष्टरित्या तपास केला. आमच्या फॉरेन्सिक टीमने हरवलेले मोबाइल शोधले, मोबाइलमधून डिलीट केलेला डेटा नव्या तंत्रज्ञानाने पुन्हा मिळवला. आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आले आहेत. ते पोलिसांनीच शोधले आहेत. या फोटोंना आरोपपत्रात समाविष्ट केले आहे.

ते फोटो कधी पाहिले?

सीआयडीने जेव्हा आरोपपत्र दाखल केले, तेव्हाच मला तपासात काय आहे, ते कळले, तोपर्यंत मला याबद्दल माहीत नव्हते. मी गृहमंत्री असूनही मी सीआयडीच्या कामात हस्तक्षेप केला नाही. जर मीच निष्पक्ष तपास होण्यासाठी आग्रही असेल तर दुसऱ्या कुणाचीही तपासात आडकाठी आणण्याची हिंमतही नव्हती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच तुम्ही संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो कधी बघितले? यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच मी ते फोटो पाहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येवेळेसचे फोटो पाहून धनंजय मुंडे यांनाही धक्का बसला होता. ते फोटो पाहून मन अत्यंत व्यथित झाले, अशी प्रतिक्रिया राजीनामा देताना धनंजय मुंडे यांनी दिली होती.