CM Devendra Fadnavis On Parth Pawar Land Deal case: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्यानंतर राजकीय आरोप होत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने महार वतन असलेल्या ४० एकर जमिनीची खरेदी केल्याचे बोलले गेले. या खरेदी व्यवहाराचे कोट्यवधीचे मुद्रांक शुल्कही भरलेले नाही, असा आरोप करण्यात आला. कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 रजिस्ट्री रद्द करण्यासाठी अर्ज, पण…

देवेंद्र फडणवीस म्हणाले , “माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हा जो करार त्यांनी केला होता. त्यामध्ये पैशाचे देवाणघेवाण बाकी होती, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती. दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी असा अर्ज केला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात. त्या संदर्भातील नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. हे जरी झालं तरी जी क्रिमीनल केस दाखल झाली आहे, ती याने संपणार नाही. या प्रकरणात ज्या अनियमितता आहेत, त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढील कारवाई होईल.”

याबरोबर अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अंतर्गत समितीची जी समांतर चौकशी सुरू आहे, त्याअंतर्गत चौकशी करून त्याचा अहवाल एक महिन्यात घेऊ, त्यामध्ये याची किती व्याप्ती आहे. यामध्ये अजून कोण-कोण आहे याची महिती मिळेल, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

पार्थ पवारांना अभय दिला?

पार्थ पवारांना अभय दिला आणि बाकीच्यांवर गुन्हे दाखल केले गेले असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ज्यांना एफआयआर हा काय असतो हे समजत नाही असेच लोकं अशा प्रकारचा आरोप करू शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज (करारात सहभागी असलेले लोक) असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो. त्या कंपनीचे ऑथराइज्ड सिग्नेटरी आहेत, त्यांच्यावरच एफआयआर दाखल होतो, तो एफआयआर दाखल झाला आहे.”

कोणाविरोधात एफआयआर दाखल झाला?

“जेव्हा एखादा एफआयआर होतो, तेव्हा त्यामध्ये ज्यांनी सही केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी चुकेचे रजिस्ट्रेशन केलं ते अशा सर्वांवर हा एफआयआर दाखल झालेला आहे. चौकशी दरम्यान अजूनही कोणाची नावे आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते. आता जो एफआयआर केला आहे, त्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही. नियमानुसार ऑथराइज्ड सिग्नेटरी, नियमानुसार पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर हे एफआयआरचे जबाबदार असतात, त्यांना जबाबदार धरलं आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.