CM Devendra Fadnavis कोकणातील मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती उद्घाटन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकोट येथील पुतळा कोसळल्याच्या घटनेचा उल्लेख करुन या पुतळ्याची उभारणी करणार असा निर्धार आम्ही केला होता असं वचन आम्ही महाराष्ट्राला दिलं होतं. त्यानंतर ९१ फुटांचा हा पुतळा तयार करण्यात आला आहे. किमान १०० वर्षे या पुतळ्याला काही होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच तेजाने आणि त्याच स्वाभिमानाने अणि भव्यतेने उभा झाला आहे. मागच्या काळात दुर्दैवी घटना घडली होती. त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेत आम्ही हा पुतळा पुन्हा प्रस्थापित करु. आम्ही अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा प्रस्थापित झाला आहे. आज आम्ही त्याचं पूजन केलं आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं अभिनंदन करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिल्पकार सुतार यांनी अतिशय उत्तम दर्जाचा हा पुतळा तयार केला आहे. त्यांच्यासह आयआयटीचे इंजिनिअर, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे लोक होते. कोकणात वेगवेगळ्या प्रकारची वादळं येतात. तौक्ते, फयान यांसारख्या वादळांचा विचार यात करण्यात आला आहे. कितीही सोसाट्याचा वारा आला तरीही पुतळ्याला काहीही होणार नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराजांना साजेसं स्मारक उभं करायचं हे ठरवलं होतं त्यानुसार आता पुतळा उभा राहिला आहे असंही फडणवीस म्हणाले.

९१ फुटांचा पुतळा इथे दिमाखात उभा करण्यात आला-देवेंद्र फडणवीस

शिल्पकार सुतार यांनी उत्तम पुतळा तयार केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे तुफान येतात. वादळं येतात. या सर्वांचा अभ्यास करून. त्यापेक्षा अधिक सोसाट्याचा वारा, वादळ आले तरी हा पुतळा तसाच उभा राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा पुतळा जवळपास ९१ फुटांचा आहे. त्यात १० फुटाचे पेडेस्ट्रॉल आहे. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा असल्याचे ते म्हणाले. पुढील किमान १०० वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. तर त्याचे देखभालीचे काम ज्यांनी पुतळा तयार केला, त्यांच्याकडे पुढील १० वर्षे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासंबंधीची हमी त्यांनी घेतली आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.