CM Devendra Fadnavis remark on politics over solapur Heavy rain and flood : राज्यातील विविध भागात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान ही मदत तुटपुंजी असल्याचा दावा विरोधी पक्षातील नेते करत आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्तीच्या काळातही राजकारण करण्याच्या मुद्द्यावर विरोधकांना सुनावले आहे.

मुंबई-सोलापूर विमान सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर येथे झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. सोलापूर येथे झालेला पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर हा राज्य सरकारने आणला असे विधान एका नेत्याने केल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच या नेत्याला एक फूल द्या आणि लवकर बरे व्हा असे सांगा, असे फडणवीस म्हणाले आहेत.

अशा नेत्याला एक फूल द्या…

आपत्तीच्या काळात राजकारण करणाऱ्या सोलापुरातील एका नेत्याला उद्धेशून फडणवीस म्हणाले की, “मला कधीकधी आश्चर्य वाटतं. अतिवृष्टीसारख्या आपत्तीच्या वेळीही काही लोक राजकारण करतात. काही लोकांच्या डोक्यात तर इतका किडा गेलाय. सोलापुरात मला एक विधान ऐकायला मिळालं. त्यावर हसावं की रडावं मला कळत नाही. इथले एक नेते म्हणाले की सोलापूरमध्ये झालेला इतका पाऊस निसर्गामुळे नाही झाला, तर राज्य सरकारने आणला. हा महापूर राज्य सरकारने आणला….काही हरकत नाही. त्यांना एक फूल द्या आणि ‘गेट वेल सून’ सांगा. कधीकधी असा मानसिक परिणाम होत असतो. काळजी करण्याचं कारण नाही. पण हे सरकार कितीही आपत्ती आली, तरी आपल्या शेतकर्‍यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिल,” असे फडणवीस म्हणाले.

मदत कधीपर्यंत मिळणार?

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार याबद्दलही भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “ज्या-ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो, त्या-त्या वेळी आमचं सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे असते. मला हे सांगताना आनंद वाटतो की, शेवटी शेतकर्‍यांचं जे नुकसान होतं, त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाहीत. पण महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज आपण यावर्षी दिले. ३२ हजार कोटी रुपये आपण शेतकर्‍यांना दिले. शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जाणं सुरू झालं आहे. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जातील. काहींना थोडे उशिराही मिळतील. आमचा प्रयत्न आहे की या महिन्यात ते शेतकर्‍यांच्या खात्यात गेले पाहिजेत.”