रत्नागिरी : कोकणात होत असलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका न घेता सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या विरोधकांना केले आहे.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिंदे शुक्रवारी प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत राजापूर तालुक्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत छेडले असता ते म्हणाले की, आम्ही बहुसंख्य लोकांबरोबर आहोत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे विरोध असलेले ठिकाण बदलून प्रकल्प उभारणीचे नियोजन चालू आहे. प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आधीच्या सरकारने प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक पावले उचलली होती. परंतु आधी हो म्हणायचे आणि नंतर आपल्याच लोकांना सांगून विरोध करायचा, अशी त्यांची पद्धत होती. समृद्धी महामार्गाबाबतही असेच आव्हान होते. त्या वेळीही राजकारण केले जात होते; परंतु ते लोकांनीच हाणून पाडले. तीच परिस्थिती येथे पाहायला मिळेल. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा असून त्यातून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. तसेच रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे. काही लोकांनी केवळ राजकारणापायी दुटप्पी भूमिका घेतली आहे. तसे त्यांनी करू नये. 

प्रकल्प उभारणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आहे का, या प्रश्नावर थेट उत्तर न देता शिंदे म्हणाले की, प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना चांगला मोबदला दिला जाणार असून त्यावर लवकरच निर्णय घेणार आहोत. 

कोकणच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा आपल्या सरकारचा निर्धार असल्याचे जाहीर करून मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन, समुद्र किनारे विकास, गडकिल्ले संवर्धन, कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण इत्यादी बाबींचा उल्लेख केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम कंत्राटदाराच्या चुकांमुळे रखडले. सध्या ते युद्धपातळीवर चालू असून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. याचबरोबर, कोकणातील समुद्र किनाऱ्यांपर्यंत जोडण्यासाठी सागरी महामार्ग एमएसआरडीएच्या माध्यमातून प्रस्तावित केला आहे. त्यावर लवकरच काम केले जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.