लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “दीड वर्षापूर्वी त्यांचा टांगा पलटी करावा लागला”, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कुटुंबातील असूनही मुख्यमंत्री झालो. सर्वांना माझा प्रवास माहिती आहे. ज्यावेळी सर्वसामान्य माणूस मोठा होतो, त्यावेळी सामान्य माणसांच्या वेदना त्याला माहिती असतात. त्यामुळे बाबुराव कदम हेदेखील प्रामाणिकपणे काम करतील. गेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. ते शिवसेनेच्या तिकीटावर उभे असते तर पराभव झाला नसता. त्यावेळी मी त्या प्रक्रियेमध्ये होतो, पण तेव्हा फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांनी बाबुराव कदम यांचे तिकीट कापले”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हेही वाचा : महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “त्यांना प्रत्यक्ष फिल्डवरची परिस्थिती माहिती नाही. त्यामुळे एक आमदार आपला कमी झाला. असे अनेक तिकीट कापले गेले. अनेक कार्यकर्ते वंचित राहिले. त्यामुळेच मी दीड वर्षांपूर्वी उठाव करण्याचे धाडस केले आणि ते धाडस संपूर्ण जगाने पाहिले. शिवसेना वाचवण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद देण्यासाठी आम्ही हे सरकार स्थापन केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आणि शिवसेना-भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. खरे म्हणजे हे २०१९ मध्येच व्हायला हवे होते. पण स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले”, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मतदान मागितले होते. मग सरकार कोणाबरोबर स्थापन व्हायला हवे होते? आणि कोणाबरोबर सरकार स्थापन झाले?”, असा प्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. ते पुढे म्हणाले, “आता तर महायुतीबरोबर अजित पवार आलेले आहेत. मनसेही आपल्याबरोबर आले आहेत. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झाले आहे. ते (ठाकरे गट) म्हणत होते की, आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल. पण त्यांचा ज्योतिषी कच्चा निघाला. आपले सरकार सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जात आहे. त्यामुळे मला त्यांचा टांगा पलटी करावा लागला, सरकार पलटवावे लागले”, असा निशाणा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला.