मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून अनेक वरीष्ठ राजकीय नेतेमंडळीच्या भेटीगाठी ते घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना शिंदे गटावर परखड शब्दांत टीका केली आहे. “शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील”, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊतांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. दिल्लीत भेटीगाठींदरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यादरम्यान शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे गटाला लक्ष्य केलं. “शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. १०० आमदार आणि २५ खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील. शिवसेनेसोबत बेईमानी करणे सोपे काम नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की…”

पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यासंदर्भात विचारणा केल्यानंतर त्यावरून त्यांनी खोचक शब्दांत टीका केली. “फक्त ५०? पण ५० खोके कसले? मिठाईचे की अजून कसले?” असा प्रश्न विचारत शिंदेंनी टोला लगावला. “एखादा ग्रामपंचायत सदस्यही इकडून तिकडे जायला चार वेळा विचार करतो. हे ३-४ लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. आम्ही सभागृहात सावरकरांच्या बाबतीत बोलू शकत नव्हतो. अनेक मुद्द्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की अन्यायाविरोधात पेटून उठा. आमचं हे बंड नाहीये, हा पक्षातला मोठा उठाव आहे. हे सगळे स्वेच्छेने आलेले आहेत. ते पैशाने विकले जाणारे नाहीयेत. त्यांना आता दुसरं काहीच नाहीये आरोप करायला. ते करत बसतील”, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

५० खोके पचणार नाही, शिवसेना सोडून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला हे सांगून टाका – संजय राऊत

“लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. पण मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. त्यांना सगळं कळतंय. आम्ही आमचं काम करत राहू. कुणीही काहीही बोललं तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. जे अडीच वर्षापूर्वी स्थापन व्हायला हवं होतं, ते सरकार आम्ही आता स्थापन केलं आहे”, असं देखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.