शिवसेना ( शिंदे गट ) खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या विधानानंतर एकच खळबळ उडाली आहे. “आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. तरीही, भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळत आहे,” असं वक्तव्य गजानन कीर्तिकरांनी केलं आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गजानन कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गजानन कीर्तिकरांनी खंत व्यक्त केली होती. “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, एनडीएचा घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.”

हेही वाचा : “आशीष देशमुख हे आंतरराष्ट्रीय नेते, त्यांना…”, अनिल देशमुखांनी उडवली खिल्ली

२२ जागा शिवसेनेच्या आहेतच…

लोकसभेला २२ जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर कीर्तिकरांनी म्हटलं की, “दावा करण्याची गरज नाही. २२ जागा शिवसेनेच्या आहेतच. २०१९ साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला २६ आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. २६ पैकी भाजपाचे २३ खासदार, तर शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते.”

“गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भाजपा…”

गजानन कीर्तिकरांनी केलेल्या वक्तव्याबद्दल एकनाथ शिंदे यांना अहमदनगरमध्ये माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भाजपा मित्र आहेत. त्यात निवडणुकीला आणखी वेळ आहे. त्यामुळे सर्व व्यवस्थित होईल. कोणाला काहीही करण्याची आवश्यकता नाही.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला, पण…”, दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यावर फडणवीसांचा हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चिखलात दगड टाकल्यावर…”

‘शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो राजकीय पक्ष नाही. या कोंबड्या कधीही कापल्या जातील,’ असं वक्तव्य शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याबद्दल विचारल्यावर एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे. “चिखलात दगड टाकल्यावर काय होत?,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.