राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाबरोबरच पक्षचिन्हावर आपला दावा कायम असल्याचं विधान मुंबईमधील एका कार्यक्रमातील मुलाखतीत केलं आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्ष मोठा करण्यात सर्वांचाच वाटा असून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचं म्हटलं. याच मुलाखतीमध्ये शिंदे गट भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला त्यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्याचं पहायला मिळालं.

मुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये सहभागी झाले होते. यावेळेस त्यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातही भाष्य केलं. “अजूनही तुमचा पक्षावर दावा आहे का? धनुष्यबाणावर दावा आहे?” या प्रश्नाला एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता, “प्रश्नच नाही,” असं म्हणत उत्तर दिलं. “आम्ही दुसरीकडे गेलेलोच नाही. आम्हीच पक्ष आहोत,” असंही शिंदे म्हणाले. “देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं असेल की पक्षाच्या अध्यक्षांना पक्षातून काढून टाकलं आणि लोक आम्हीच पक्ष असल्याचं म्हणत आहेत,” अशा शब्दांमध्ये मुलाखतकाराने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. त्यावर शिंदेंनी, “पक्ष तर आम्हीच वाढवालाय ना? आम्हीच बाळासाहेबांबरोबर काम करुन पक्ष वाढवला आहे. सर्वांचीच मेहनत हा पक्ष मोठा करण्यामध्ये आहे,” असं उत्तर दिलं. “शिवसेनेची ओळख तर ठाकरेंची शिवसेना अशी आहे,” या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत ना?” असा प्रतिप्रश्न केला.

ठाकरे अडनाव तुमच्याकडे नाही, असं पत्रकाराने मध्येच म्हटल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी, “बाळासाहेब ठाकरेंची विचारसणी आम्ही सोडलेले नाही. लोकांना हवं होतं ते आम्ही केलं आहे. आज आम्ही जिथे जिथे जातो तिथे हजारोंच्या संख्येने लोक जमतात. चला सभांना तरी लोक गाड्यांमधून आणतो म्हटलं तरी रस्त्यावर जमणाऱ्या गर्दीचं काय? हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बरंच काही सांगून जातात,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, “हे पाहा लोकांना जे हवं होतं तेच आम्ही केलं आहे. त्यामुळे लोकांचं समर्थन आम्हाला मिळत आहेत. हजारो लोक आम्हाला समर्थन देत आहेत यामागील कारण म्हणजे त्यांच्या डोक्यात आणि मनात असलेली नैसर्गिक युती आम्ही केली आहे. बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार हाच आमच्यासाठी ऑक्सिजन आहे,” असं विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं.

नक्की वाचा >> ‘वेदान्ता-फॉक्सकॉन’, ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला का गेले? गडकरी म्हणाले, “कारण नसताना लोक राज्यांवरुन…”

बंडखोर शिंदे गट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या दाव्यांवरही मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही भाजपामध्ये जाणार असं म्हटलं जात होतं,” असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “ते केवळ म्हणत होते ना. ते तर असंही म्हणत होते की भाजपाचा मुख्यमंत्री होणार. कुठे झाला भाजपाचा मुख्यमंत्री? आमच्याबद्दल काय काय म्हणत होते त्यावेळेस, हे होणार, ते होणार. आम्ही लोक बाळासाहेबांची विचारसणी पुढे नेत आहोत. आम्ही बिलकूल मागे हटलो नाही,” असं म्हटलं. मुलाखतकाराने बाळासाहेबांचे विचार कोण पुढे घेऊन जाणार हे निवडणुकांनंतर स्पष्ट होईल असं म्हटलं असताना शिंदेंनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा संदर्भ दिला. “बाळासाहेबांचे विचार कोण पुढे नेणार हे तर निवडणुकीमध्ये समजेल ना,” असं मुलाखतकाराने म्हटलं. त्यावर शिंदेंनी, “ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून दिलं ना. भाजपाच्या ३९७ जागा जिंकून आल्या. आमच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या २७७ जागा आल्या. पहिलं आणि दुसरं स्थान आमचेच आहे. पुढेही बघूच आपण,” असं म्हटलं. शिंदे यांनी आपल्या उत्तरांमधून बंडखोर आमदारांचा गट भाजपामध्ये सहभागी होण्याचा प्रश्नच नसून बंडखोर आमदार हेच शिवसेना पक्ष असल्याचा दावा पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं दिसून आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तीबरोबर सत्तेत असताना तुमची धोरणं तुम्ही कशी राबवणार असा प्रश्नही मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. तुम्ही मुख्यमंत्री झालात. पण तुमचं विकासाचं मॉडेल महाराष्ट्रात दिसावं यासाठी तुम्हाला मेहन घ्यावी लागणार आहे. कारण तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत आहात जे स्वत: पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची स्वत:ची एक प्रतिमा आहे. असं असताना तुमच्यासमोर किती मोठं आव्हान आहे. तुम्ही तुमची धोरणं महाराष्ट्रामध्ये कशी राबवणार आहात? असा सविस्तर प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी, “आमचं धोरण हे लोकांसाठी, विकासासाठी, सर्वसमावेशक सरकारचं आहे. आमचं सरकार लोकांनी लोकांसाठी बनवलेलं आहे. लोकांना हा मुख्यमंत्री आपल्यातला वाटतो. माझ्यासाठी सीएम म्हणजे चिफ मिनिस्टर नसून कॉमन मॅन असं आहे. त्यामुळेच आजही मी सर्वसामान्यांप्रमाणे काम करतो,” असं म्हटलं.