आम्ही अयोध्येत आम्ही उत्साहाने जात आहोत, तिथे खूप चांगली आणि उत्साहाने तयारी होते आहे. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अनेकजण चालले आहेत. कुणी ट्रेनने जातं आहे, कुणी विमानाने जातं आहे. एक चांगला उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहण्यास मिळतो आहे. आम्ही रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातो आहोत त्यातही विरोधकांना टीका करावीशी वाटते आहे तर त्यांना काही सुचेनासं झालं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आपल्या अयोध्या दौऱ्याच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. जे लोक कधी दिसतही नव्हते ते रस्त्यावर उतरले आहेत. चांगलं परिवर्तन आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांनी?
आपण गेल्या सात ते आठ महिन्यात राज्याच्या लोकांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आपण चांगले निर्णय घेतल्याने विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पूर्वी कुठे दिसत नव्हते ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत. लोकांना भेटू लागले आहेत हे चांगलं परिवर्तन आहे. काही लोकं बरेही झाले आहेत असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता हा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
अजित पवारांनी काही बोलूच नये
अजित पवारांनी काही बोलूच नये, शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर ते काय देतात? मला जुन्या विषयांवर बोलायला लावू नका. राम मंदिर व्हावं ही रामभक्तांची इच्छा होती. हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आहे. अयोध्या आणि आमचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि योगी आदित्यनाथ त्यांना सहकार्य करत आहेत ही अभिमानाची बाब आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विरोधक काय बोलायचं असेल ते त्यांना बोलू द्या असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अयोध्या हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे.
आदित्य ठाकरेंचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी काम करतो आहे
राज्यात रावणराज आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जाऊ द्या हो त्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी काम करतो आहे. विरोधकांना काय बोलायचं असेल ते बोलू द्या. आम्ही त्याला बोलून उत्तर देणार नाही तर आमच्या कामाने उत्तर देऊ.