औरंगाबादमध्ये अनेक दिवसांपासून रखडलेल्या संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाच्या नूतनीकरण झालेल्या वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाला संबोधित केले. तसेच जनतेची सेवा करताना राजकारण मध्ये येऊ न देता आपण कामे करावीत असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून लवकरच केंद्राची मंजुरी मिळेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“बरेच दिवस मी संभाजीनगरमध्ये येऊ शकलेले नाही. पण ही उणिव मी भरून काढल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर मी तमाम संभाजीनगरकरांच्या दर्शनासाठी आल्याशिवाय राहणार नाही. संभाजीनगरच्या रहिवाश्यांना दिलेली वचने बऱ्याच प्रमाणात पूर्ण केली आहेत. महानगरपालिकेवरचा भगवा संभाजीनगरकरांनी उतरू दिला नाही. हा मला आत्मविश्वास आहे. नाट्यगृहे, उद्याने यासारख्या गोष्टींकडे थोडेसे दुर्लक्ष होते. मनोरंजनाच्या ठिकाणांकडे नाही म्हटले तरी दुर्लक्ष होत आहे. जगताना या गोष्टी बाजूला ठेवल्या तर मग जगायचे कसे हेच आपल्याला कळणार नाही. आजचं संत एकनाथ महाराज रंगमंदिर नाट्यगृहाचे रुप बदलेले आहे. संभाजीनगरच्या लोकांसाठी या नाट्यगृहाचे लोकार्पण झालेले आहे. संभाजीनगरकरांना जसा पूर्वी आनंद मिळत होतो तसाच आत्ताही मिळेल असा मला आत्मविश्वास आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“एखादी गोष्ट होऊ शकत नाही असे नाही पण लक्ष द्यायला हवे. मार्ग काढण्याची जिद्द असली पाहिजे. ती जिद्द आपण दाखवत आहोत. इतरांचे गोष्ट ठिक आहे. निवडणुका आल्या की बोलायचे, टाळ्या वाजवून घ्यायच्या, मते मिळवायची आणि वचनाकडे पाठ फिरवायची. पण शिवसेना त्या संस्कृतीतील नाही. संभाजीनगरच्या विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेला ठराव आपण दिल्लीला पाठवला आहे. आता दिल्लीला परत एकदा आठवण करुन देण्याची गरज आहे. आमच्या विमानतळाचे आम्हाला बारसे करुन हवे आहे आणि हा आनंद केंद्र सरकार लवकरात लवकर दिल्याशिवाय राहणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आजचा कार्यक्रम हा शासकीय आहे त्यामुळे मला इथे राजकारण आणायचे नाही. जी कामे महाराष्ट्र शासनाच्या दारी अडली आहेत ती मला सांगा. तुमचे पालकमंत्री सुभाष देसाई काम करत आहेत. दिल्लीमध्ये भागवत कराड आणि रावसाहेब दानवे काम करत आहेत. त्यामुळे राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवावे. जनतेची सेवा करताना राजकारण मध्ये येऊ न देता आपण कामे करावीत. आपण माणसं आहोत. विरोधी पक्षात गेले म्हणजे रुसून बसायचे असे होत नाही. जनतेच्या कामासाठी सगळे लोकाप्रतिनिधी कसे एकत्र येतात याचा मला फोटो काढून ठेवायला पाहिजे. आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचे जनतेची कामे करण्यासाठी एकमत आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm uddhav thackeray reaction to the proposal to name the airport in aurangabad after chhatrapati sambhaji maharaj abn
First published on: 25-01-2022 at 20:38 IST