मोबाईलच्या माध्यमातून शेतातील पिकाची नोंद करण्याचे प्रात्यक्षिक स्वत: करून दाखविण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार आज थेट शेताच्या बांधावर पोहोचल्या.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबारावर स्वत: करून घेता यावी, यासाठी शासनाने ‘ई पीक पाहणी अ‍ॅप’ सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामूळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार आहे. या अ‍ॅपबाबत विविध समस्या शेतकऱ्यांना जाणवत असल्याच्या तक्रारी आहे. त्याची खातरजमा करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज लगतच्या बरबडी येथील सोनोबा गुरनूले यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याला शेतातील टमाटे, वांगी आणि दोडके या पिकांची नोंद घेण्यासोबतच शेतातील सिंचन सुविधेची सुध्दा नोंद अ‍ॅपमध्ये करून दाखविली.

शेतकरी कधीही खरिप व रब्बी पिकाची नोंद ठेवू शकतो –

एका मोबाईलवरून २० शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेता येते. पीक पाहणी अ‍ॅप शेतकऱ्यांना उपयोगात आणण्यासाठी अतिशय सोपे आहे. शेतकरी कधीही त्यांच्या खरिप व रब्बी पिकाची नोंद ठेवू शकतो. नोंद करतांना अडचणी आल्यास त्या सोडविण्याचा तत्पर प्रयत्न महसूल प्रशासन करेल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून जिल्हाधिकारी देशभ्रतार यांनी उपयुक्त माहिती दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.