सांगली : ईरशाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात भूस्खलनाचा धोका असलेल्या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
शिराळा तालुक्यातील भूस्खलन सदृश्य परिस्थिती असणाऱ्या मिरूखेवाडी व कोकणेवाडी गावातील संभाव्य धोका टाळण्यासाठी व गरज पडल्यास या भागातील लोकांचे स्थलांतराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दोन्ही गावात पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा बँक संचालक सत्यजीत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक उपवनसंरक्षक नीता कट्टे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उमेश पोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सहाय्यक उपवनसंरक्षक अजितकुमार साजणे, तहसिलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, विभागीय वन अधिकारी श्री. काळे, माजी सभापती हणमंतराव पाटील, विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक आदि उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतनिहाय दिलेल्या साहित्यांचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना देऊन डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मणदूर, आरळा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वाड्यांवरती टॉर्च, रोप, लाईफ जॅकेट आदिंची अतिरीक्त मागणी करून ठेवावी. जिल्हा प्रशासनाकडून गरजेवेळी बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संपूर्ण पुनर्वसनाच्या ग्रामस्थांच्या मागणीसंदर्भात आगामी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पश्चिम भागातील वाड्यांवर रेंज नसल्यामुळे प्रशासनाचा या वाड्यांशी असणारा संपर्क तुटतो. या पार्श्वभूमिवर तालुका प्रशासनाने संबंधित वाड्या – वस्त्यांवरील लोकांना सॅटेलाईट फोनचे प्रशिक्षण द्यावे. संबंधित वाड्यांवर सॅटेलाईट फोन ठेवण्यासंदर्भात त्यांनी तहसिलदार यांना सूचित केले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आदिंबाबत मत मांडले. सत्यजीत देशमुख यांनी खुंदलापूर धनगरवाडा गावात ग्रामस्थांनी स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतल्याने आवश्यक कार्यवाही करून सोयी सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. मणदूरच्या सरपंच शोभा माने, चांदोलीचे वन अधिकारी गणेश पाटोळे, चांदोली वन क्षेत्रपाल नंदकुमार नलावडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.