सांगली : महापालिका क्षेत्रात स्वच्छता न केलेले खुले भूखंड आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी गुरूवारी दिला. रोगाला आमंत्रित करण्यास कारणीभूत ठरणारे या अस्वच्छ भूखंडाबाबत नागरिकांनी महापालिकेस माहिती द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

महानगरपालिका क्षेत्रात खाजगी मालकीचे अनेक भूखंड आहेत. झाडेझुडपे, अस्वच्छतेमुळे आरोग्यास हानिकारक झाले आहेत. त्याची सत्वर स्वच्छता करून घेऊन परिसर स्वच्छ करणे बाबत सूचित केले होते. भूखंड स्वच्छतेबाबत सांगली, मिरज व कुपवाड शहरातील ४८४ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. याबाबत खुल्या भूखंडाचे सर्व्हेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. आरोग्य विभागाने २१८ भूखंड स्वच्छ करवून घेतले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही भागांमध्ये अद्याप खाजगी भूखंड धारकांनी स्वच्छता केली नसल्याचे निदर्शनास आलेआहे. नागरिकांच्या आरोग्याशी सबधित सदरची बाब अत्यंत महत्त्वाचे असल्याने महापालिकेच्यावतीने स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे सदर भूखंडाचे मालक शोधून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. नागरिकांनीही अस्वच्छ भूखंडाबाबत माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे द्यावी असे आवाहन करण्यात आले.