करोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी राज्यातील तेराही विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन करून राज्यस्तरावर एकच ‘सामायिक परीक्षा’ (सीईटी) घेण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते नागपूर येथे युवा सेनेच्या कार्यक्रमाला आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली. बारावीच्या मूल्यांकनासाठी शिक्षण विभागाने अद्याप कुठलाही मार्ग सुचवलेला नाही. शिवाय पदवी प्रथम वर्षांला अनेक अभ्यासक्रम असल्याने प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रवेशपूर्व परीक्षा (सामायिक परीक्षा) घेणे शक्य नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश कसे होणार, असा प्रश्न महाविद्यालयांसह विद्यार्थ्यांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

बारावीची परीक्षा रद्द केल्याने पदवी प्रथम वर्षांच्या प्रवेशावर संकट

करोनामुळे प्रथमच सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. आता केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणेच राज्यातही बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली.

खासगी विद्यापीठांतील प्रवेशांसाठीची ‘पेरा सीईटी’ १६ ते १८ जुलैदरम्यान

दरम्यान, राज्यातील खासगी विद्यापीठांच्या ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रीसर्च असोसिएशन) या संघटनेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पेरा सीईटी २०२१ यंदा १६ ते १८ जुलै दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी १० जुलै ही अंतिम मुदत असून, २३ जुलैला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राज्य शासनाकडून सीईटी घेतली जाते. तसेच पेरा सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील १३ खासगी विद्यापीठांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येतो. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना घरबसल्या पेरा सीईटी देता येईल.

HSC Exams : यंदा बारावीचे सगळेच विद्यार्थी पास! अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय!

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आणि त्यांचं गुणांकन कसं होणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल, असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. अखेर शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भातली घोषणा केली

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Committee of vice chancellors of universities for admission to the first year of degree uday samant msr
First published on: 13-06-2021 at 20:18 IST