नमाज पठण कशाप्रकारे करतात? याविषयी मुस्लिमेत्तर समाजातील लोकांना नेहमीच कुतूहल असते. या पार्श्वभूमीवर नमाज पठणाची कृती सादर करून कोल्हापुरात मुस्लीम बांधवांनी रविवारी समता, बंधुता व एकता याचा वेगळा अनुभव हिंदू बांधवाना दिला.

शाहूपुरी येथील जामा मशीदीत रविवार सायंकाळी ६ वाजता मुस्लीम बांधवांनी नमाज कशा पद्धतीने पठण केली जाते, याची माहिती देण्यासाठी व याबाबत असलेले तर्कवितर्क बाजूला सारून समाजातील कटूता संपावी, चांगले ऋणानुबंध तयार व्हावेत यासाठी जाहीर नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कलमा, रोजा, नमाज, जकात व हज या पाच गोष्टी इस्लाममध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात. नमाज म्हणजे इस्लामची उपासनापद्धती. याला कुणी ‘नमाज’, तर कुणी ‘सलात’ असं म्हणतात. दिवसातून पाच वेळा नमाज पठण केली जाते. ती कशाप्रकारे केली जाते, याची कृती सर्वांच्या साक्षीने यावेळी पार पडली. शिवाय नमाज पठणाबाबत असलेल्या शंकांचे देखील निरसन करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हारसेनेचे बबनराव रानगे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकघोंड, नगरसेवक राहुल चव्हाण उपस्थित होते. मुस्लीम बोर्डिंगचे कादरभाई मलबारी, गणीभाई आजरेकर, अमर समर्थ, मधुकर काकडे, तयब मोमीन, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, अवधूत पाटील यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.