सोलापूर : मी सध्या कुठेच नसलो तरी सगळीकडेच आहे, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्यामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा संशयाचे धुके निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.माढा तालुक्यातील कापसेवाडी येथे गुरूवारी द्राक्ष बागायतादार शेतक-यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. हा शेतकरी मेळावा गेल्या २३ आॕक्टोंबर रोजी दस-याच्या मुहूर्तावर होणार होता. त्या एकाच दिवशी शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही स्वतंत्र दौरा ठरला होता. अजित पवार हे ठरल्यानुसार माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. तर शरद पवार हे न आल्यामुळे  कापसेवाडीतील शेतकरी मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. अखेर हा मेळावा गुरूवारी झाला.

द्राक्ष बागायतदारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतक-यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपण प्रमुख सहका-यांना सोबत घेऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. याचवेळी बोलताना त्यांनी, मी सध्या कुठेही नाही. परंतु सगळीकडेच आहे, असे सूचक विधान केल्यामुळे सर्वांच्या भुवय्या उंचावल्या.गेल्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेमध्ये फूट पडून अजित पवार हे बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यामुळे शरद पवार गट अडचणीत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खरी कोणती, यासाठी दोन्ही पवार गटांची निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार दोघेही अधुनमधून एकमेकांना भेटतात. राजकारण वेगळे आणि नाते वेगळे, विचारधारा बदलली तरी कौटुंबिक नाते कायम असल्याचे पवार कुटुंबीयांकडून सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी माढ्यात कापसेवाडीच्या शेतकरी मेळाव्यात केलेले सूचक भाष्य राज्यातील राजकारणात पुन्हा संशयाचे धुके निर्माण करणारे आहे, असे बोलले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्यात संयोजक नितीन कापसे यांच्यासह माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील, धनाजी साठे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव, माढ्यातील नेते संजय पाटील-घाटणेकर, माढ्याच्या नगराध्यक्षा ॲड. मीनल साठे, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आदी उपस्थित होते.