सागरी पोलिसांच्या आदेशामुळे उत्तन बंदरातील मच्छीमारांमध्ये उलटसुलट चर्चा

मिल्टन सौदिया, लोकसत्ता

वसई : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात मत्स्योत्पादन आणि सामाजिक दूरीकरणाच्या माध्यमातून केली जाणारी मत्स्यविक्री यास केंद्र तथा राज्य सरकारने मंजुरी दिली असली तरी उत्तनच्या सागरी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील मच्छीमारांना मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये मासेमारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सागरी पोलिसांनी मासेमारीस घातलेली बंदी अन्यायकारक असल्याच्या प्रतिक्रिया मच्छीमारांमधून व्यक्त होत आहेत.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जारी करण्यात आली आहे. मात्र, या टाळेबंदीतून जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन, विक्री यास वगळण्यात आले आहे. मासळीचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला असून त्यानुसार सामाजिक दूरीकरणाच्या नियमांसह काही अटीशर्तींचे पालन करून खोल समुद्रातील मासेमारी तसेच मासळीविक्रीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी समुद्रात जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक सोमवारी भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील सागरी पोलिसांनी मच्छीमारांना मासेमारीकरिता समुद्रात न जाण्याचे निर्देश प्रसृत केले.

उत्तन हा बहुसंख्य मच्छीमारांचे वास्तव्य असलेला किनारी भाग ठाणे जिल्ह्यात येतो. करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा जिल्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षितता तथा आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सागरी पोलिसांनी मच्छीमारांना मासेमारीकरिता न जाण्याचा इशारा दिला आहे. ज्या बोटी मासेमारीकरिता गेल्या आहेत, त्यांच्याशी बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून संपर्क करून त्यांना याबाबत माहिती देण्याचेही पोलिसांनी मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना सांगितले आहे.

समुद्रातील मासळी बंदरात उतरवू नये तसेच विक्रीकरिता गावाबाहेर नेऊ  नये, असेही पोलिसांनी म्हटले आहे. मच्छीमारांनी सूचनेचे उल्लंघन केल्यास दंडनीय तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. यासंदर्भातील उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. निकम यांचे पत्र समाजमाध्यमातून व्हायरल झाले असून ते चर्चेचा विषय ठरले आहे.  दुसरीकडे, मासेमारी बंद ठेवण्याचा पोलिसांनी काढलेला आदेश अन्यायकारक असल्याचे मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी म्हटले आहे.

संपूर्ण देशात जो जो भाग करोना संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक स्थितीत आहे, त्याठिकाणी सामाजिक दूरीकरणाच्या नियमांचे पालन करून जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात असताना केवळ मासेमारीवर अशाप्रकारे बंदी घालणे अयोग्य आहे. सागरी पोलिसांचा आदेश अन्यायकारक आहे.

– दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

पोलिसांनी मासेमारीला बंदी घातलेली नाही. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे मासेमारी करताना खबरदारी घेण्याची मच्छीमारांना विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार मच्छीमारांच्या सहकारी संस्थांनी ठराव करून मासेमारीस न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

– सतीश निकम, साहाय्यक पोलीस निरीक्षक, उत्तन सागरी पोलीस ठाणे

मत्स्यव्यवसाय खात्याने मासेमारीला कोणत्याही प्रकारे बंदी घातलेली नाही. मासेमारी करताना मास्क वापरणे, सामाजिक दूरीकरणाच्या नियमांचे पालन करणे यासह ४३ अटी-शर्तींनुसार मत्स्यव्यवसाय खात्याने मासेमारीस परवानगी दिलेली आहे.

– अजिंक्य पाटील, साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त, पालघर

चार भागांमध्ये आदर्श कार्यप्रणाली

मत्स्यव्यवसाय खात्याच्या आयुक्तांनी मच्छीमारांसाठी चार भागांमध्ये आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. मासेमारीकरिता जाण्यापूर्वी, प्रत्यक्ष सागरी मासेमारी करताना, मासेमारी करून बंदरात आल्यावर आणि पकडलेल्या मासळीची वाहतूक प्रक्रिया अशाप्रकारे ही कार्यप्रणाली विभागण्यात आली असून त्यामध्ये एकूण ४३ अटीशर्तींचा उल्लेख आहे. या अटीशर्तींचे योग्य पालन न केल्यास सागरी मासेमारीस दिलेली परवानगी रद्द केली जाईल, अशा इशारा आहे. या कार्यप्रणालीचे तंतोतंत पालन करायचे झाल्यास मासेमारी करताच येणार नाही, असे मच्छीमारांकडून सांगण्यात येते.